पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचा पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना इशारा

पोलीस हे नागरिकांच्या मदतीसाठी आहेत, त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी नाही. पोलिसांना नागरिकांनी सदैव सहकार्य केले पाहिजे. पण, कर्तव्य बजावत असताना त्यात अडथळे आणणे, त्यांच्यावर हल्ले करणे असे प्रकार झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. हल्लेखोरांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असा सज्जड इशारा पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिला आहे. पोलिसांवर हल्ले करणारे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असो, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत पोलिसांवर वाढलेल्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. कर्तव्य बजावत असताना पोलिसांचा नागरिकांशी संबंध येतो, अशावेळी कायदे-नियम जाचक वाटून किंवा दंड भरणे अयोग्य वाटल्याने नागरिक-पोलीस यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. पण, थेट पोलिसांवर हात उगारणे हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असे माथूर यांनी स्पष्ट केले. अशा हल्लेखोरांना पकडून त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी विशेष लक्ष देण्याचे आदेश मी राज्यभरातील आयुक्त-अधीक्षक यांना दिल्याचेही ते म्हणाले. नागरिकांचे वाहतूक पोलिसांशी सर्वाधिक खटके उडत असल्याचेही दिसून येत असून पोलिसांनाही नागरिकांशी वागताना सौजन्याने वागण्याच्या सूचना केल्याचे माथूर यांनी अधोरेखित केले.

  • अनेकदा, घोळक्यात असलेले तरुण आपण केलेली आगळीक खपवून घेतली जाईल, असा विचार करतात आणि उत्तेजित होऊन पोलिसांवर हात उगारतात.
  • अशा तरुणांनी एक लक्षात घ्यावे की, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभरासाठी तुमच्या चारित्र्यावर तो डाग राहील. तसेच पारपत्र मिळण्यापासून नोकरी मिळविण्यातही त्यामुळे अडचण येऊ शकते
  • एखाद्या पोलिसाचे वर्तन अन्यायकारक वाटले तर पोलीस नियंत्रण कक्ष, उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, पण पोलिसांवर हात उगारण्याची चूक करून भवितव्य खराब करू नका.
  • पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांना काही आक्षेप असतील तर त्यांनी आम्हाला सूचना कराव्यात, उपाय सुचवावेत, आम्ही नक्कीच त्याचा गांभीर्याने विचार करू, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअपवर येणारे सर्वच सत्य नसते

रविवारी मालाडच्या पठाणवाडी परिसरात दोन गटांत झालेल्या वादावादीनंतर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपवर अफवांचे पीक आले होते. त्यातही व्हॉट्सअ‍ॅपवरील अत्यंत जहाल भाषेतले संदेश पुढे पाठवले जात होते. व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे संदेश १०० टक्के सत्य मानू नका. अशा प्रकारचे संदेश पुढे पाठविण्याआधी एकदा त्याची खातरजमा करून घ्या, असे आवाहन माथूर यांनी राज्यातील नागरिकांना केले. संदेशांची खातरजमा करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष, नजीकचे पोलीस ठाणे हे स्रोत उपलब्ध असून नागरिकांनी समाजमाध्यमांचा वापर जबाबदारीने करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. चुकीचे संदेश पाठवून समाजात तेढ निर्माण झाली तर तुम्हीही आरोपी ठरू शकता, त्यामुळे नागरिकांनी सदैव सतर्क राहावे, असेही ते म्हणाले.

कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी अधिकाराचा गैरवापरही करू नये. काही वेळेस पोलीस कायदा हातात घेऊन मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. हे गैर असून असे प्रकार खपवून घेणार नाही.

– सतीश माथूर, पोलीस महासंचालक