News Flash

पोलिसांच्या केसालाही धक्का लागता कामा नये

कठोर कारवाईची उद्धव यांची मागणी

उद्धव ठाकरे

कठोर कारवाईची उद्धव यांची मागणी

पोलिसांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असे प्रतिपादन करीत हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. पोलिसांवर होणारे वाढते हल्ले, त्यांची डय़ूटी, घर व अन्य प्रश्न धसास लावण्यासाठी, सोडवणूक करण्यासाठी पोलिसांच्या संघटनेस मान्यता देण्याऐवजी उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. त्यात पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिनिधींचाही समावेश केला जाणार आहे.

पोलिसांवरचे हल्ले व प्रलंबित प्रश्नांवर ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वर्षां’ निवासस्थानी भेट घेतली. पोलिसांच्या घरांचा प्रश्न, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांचा प्रश्न, आरोग्य, दुर्घटना घडल्यास चांगले वैद्यकीय उपचार, आदी मुद्दय़ांवर फडणवीस यांच्याबरोबरच्या बैठकीत चर्चा झाली. पोलिसांच्या पत्नी व कुटुंबीयांचा त्यात समावेश होता. पोलिसांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कर्मचारी संघटनेस परवानगी देण्याची मागणी सुरू झाली आहे. मात्र लष्कर, पोलीस अशा खात्यांमध्ये संघटनेस मान्यता देता येणार नाही. मात्र त्यांचे प्रश्न सोडविले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सक्षम असले तरी त्यांच्याकडे कामाचा व्याप मोठा असल्याने गृह खात्यासाठी स्वतंत्र मंत्री हवा, असे ठाकरे यांनी  सांगितले. कल्याण येथे पोलिसाला मारहाणीच्या प्रकरणी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये व कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

हल्लेखोरांवर लवकरच कारवाई : मुख्यमंत्री

मुंबई : पोलिसांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांवर होत असलेले हल्ले व मारहाणीचे प्रकार वाढत असून त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. पोलिसाला मारहाण केल्यास किंवा कोणतीही अनुचित कृती केल्यास ती पोलीस दलाविरुद्ध असल्याचे मानून त्याची तातडीने दखल घेतली जाईल व संबंधितांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मारहाण करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी फौजदारी दंडसंहितेतील कडक तरतुदींचा वापर करून गुन्हे दाखल केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना लगेच शिक्षा व्हावी, यासाठी तातडीने आरोपपत्र दाखल करून जलदगती न्यायालयात खटले चालविले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘युती सरकारच्या काळात पोलिसांवरील हल्ल्यांत वाढ’

मुंबई : राज्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आले. गुन्हेगारांना सरकार किंवा पोलीस यंत्रणेचा धाक राहिलेला नसल्याने पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ करण्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी राज्याची अवस्था ‘क्राइम इन महाराष्ट्र’ करून टाकल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच गृह खात्याच्या एकूणच कारभाराबाबत श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी विखे-पाटील यांनी सरकारकडे केली. दिवसाढवळ्या पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. कायदा किंवा सरकारचा धाक नसल्यानेच ही नामुश्की आली आहे. सत्तेतील भागीदार असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना होत असलेल्या मारहाणीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट म्हणजे नाटक होते, अशी टीकाही विखे-पाटील यांनी केली.

भाजप आमदाराच्या जाचाला कंटाळून एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याचा दिलेला इशारा किंवा विदर्भातील भाजपच्या एका आमदाराने पोलिसाला केलेली मारहाण यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजविण्यात भाजपचीच मंडळी आघाडीवर आहेत हे स्पष्ट होते. कल्याणमध्ये पोलिसाला तलावात बुडविण्याचा प्रयत्न करणारे भाजप आमदाराचेच कार्यकर्ते असल्याचा आरोपही विरोधी पक्ष नेत्यांनी केला. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचे पुढे काय झाले, असा सवालही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 2:27 am

Web Title: attack on police can not tolerate says uddhav thackeray
Next Stories
1 बँकेतील स्वाइप यंत्राद्वारे क्रेडिट कार्ड घोटाळा
2 घरांचा ताबा देण्यासच बिल्डरांची टाळाटाळ
3 निर्विघ्न उत्सवासाठी सीसीटीव्हीचे कवच
Just Now!
X