ठाणे येथील विद्युत मेटेलिक्स कंपनीने एक हजाराहून अधिक प्रशिक्षित कामगारांना काढून टाकल्याच्या वादाने आता हिंसक रूप धारण केले असून कंपनीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोमवारी दुपारी हल्ला झाल्याने खळब़ळ उडाली आहे. या हल्ल्यातून तिघेही अधिकारी बचावले.
या हल्ल्यामध्ये कामगारांनी वाहनाची तोडफोड करून चालकास बेदम मारहाण केल्याने परिसरात काही काळ तणाव होता. हल्लेखोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेशी निगडीत असून त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
विद्युत मेटेलिक्स कंपनी व्यवस्थापनाने सुमारे एक हजारहून अधिक कामगारांना दोन महिन्यांपूर्वी अचानक कामावरून काढले होते. तीन ते चार वर्षांपासून कंपनीमध्ये काम करीत असतानाही प्रशिक्षित असल्याचे कारण पुढे करत व्यवस्थापनाने ही कारवाई केली आहे, असे या कामगारांचे म्हणणे आहे. याच कारणावरून कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये वाद रंगला होता. मध्यंतरी, कंपनीच्या गेटवर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कामगारांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये सुरू असलेला वाद कामगार उपायुक्त कार्यालयापर्यंत पोहचला असून या संबंधीची सुनावणी सोमवारी वागळे इस्टेट येथील मॉडेला चेक नाका परिसरातील कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये होती. मात्र, या सुनावणीदरम्यान कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांमुळे ते यातून बचावले. त्यानंतर कामगारांनी त्यांच्या वाहनावर हल्ला चढवून वाहन चालकास बेदम मारहाण केली. हल्ला करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी.मोरे यांनी दिली.