एकाच बिबटय़ाकडून हल्ले होत असल्याचे स्पष्ट

चित्रनगरीतील हेलीपॅड परिसरात गेल्या शनिवारी खेळत असलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलावर हल्ला करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बिबटय़ाने याआधीही मनुष्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने बुधवारी चित्रनगरी परिसरात पिंजरा लावला आहे.

चित्रनगरीत बिबटय़ाने हल्ला केल्याच्या घटनेनंतर वनविभागाने ज्या भागात बिबटय़ाने हल्ला केला त्या चित्रनगरीतील हेलिपॅडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. पहिल्या तीन दिवसांत बिबटय़ाच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या नाहीत, मात्र चौथ्या दिवशी तो कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात आढळला. डिसेंबर महिन्यात आरेतील मठेपाडय़ात तसेच तीन महिन्यांपूर्वी चाफ्याच्या पाडय़ात एका चिमुकल्यावर हल्ला करणारा बिबटय़ा हाच असावा, असा अंदाज वनपरिमंडळ अधिकारी समीर इनामदार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागपूर वनविभाग मुख्यालयाकडून या बिबटय़ाला पकडण्याची परवानगी मिळाली असून त्याच्या शरीरावर बसवण्यात आलेल्या ‘चिप’च्या साह्याने त्याची ओळख पटू शकणार आहे.

बिबटय़ाविषयी जनजागृती

गेल्या शनिवारी गोरेगावच्या चित्रनगरीत बिबटय़ाने संजय गांधी राष्ट्रीय उदय़ानातील कर्मचाऱ्याच्या अडीच वर्षांच्या मुलावरच हल्ला केल्यावर चित्रनगरीत काही प्रमाणात बिबटय़ाची दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमारेषाच चित्रनगरीच्या भोवती असल्यामुळे या भागात बिबटय़ाच वावर आहे. त्यामुळे यापुढे बिबटय़ा दिसल्यास काय करावे व काय करू नये याबाबत ठाणे वनविभागाने बुधवारी जनजागृती अभियान राबवले. ठाणे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे व्याघ्र प्रकल्प अधिकारी शैलेश देवरे, डॉ. शैलेश पेठे, रेसनिक असोसिएशनचे पवन शर्मा, मुंबईकर फॉर एसजीएनपीच्या स्वयंसेविका विद्या व्यंकटेश यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

[jwplayer uqgzGWMJ]

वनविभागाच्या सूचना

  • बिबटय़ा वावरत असलेल्या ठिकाणी एकटय़ाने प्रवास करू नये. संध्याकाळच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडणे व लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे.
  • बिबटय़ा वावरत असेल त्या मार्गावरून प्रवास करायचा असल्यास जमावाने मोठमोठय़ाने आवाज करीत प्रवास करावा. हातात काठी, बॅटरी बाळगावी.
  • आदिवासी पाडय़ांमध्ये घराबाहेर व घरात लाइट लावावी, संध्याकाळी लहान मुलांना घराबाहेर एकटे न सोडणे.
  • बिबटय़ा श्वानांची शिकार करण्यासाठी मनुष्यवस्तीत येत असल्यामुळे परिसरातील श्वानांचा वावर कमी करणे.