केंद्र सरकारने बंदी घातली असली तरी टिकटॉकच्या लोकप्रियतेआडून सायबर भामटय़ांनी नागरिकांना गंडा घालण्यासाठी शक्कल लढवली आहे. आता ‘टिकटॉक प्रो’ या नव्या नावाने हे अ‍ॅप सुरू असल्याचे भामटय़ांकडून भासवले जात आहे. ही बाब लक्षात येताच राज्याच्या सायबर विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. टिकटॉक अ‍ॅप ‘टिकटॉक प्रो’ या नावाने सुरू झाले आहे. ते डाऊनलोड करा आणि चित्रफिती पाहा, अपलोड करा, असा लघुसंदेश भामटय़ांनी सर्वदूर पसरविला आहे. या लघुसंदेशात एक लिंक देण्यात आली आहे. ही लिंक डाऊनलोड केल्यावर भामटे अ‍ॅपच्या नावे नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात, आर्थिक गंडा घालू शकतात असा इशारा देण्यात आला आहे.