वसई: प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला दोन पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. वसई पूर्वेच्या वालीव येथील एका टेकडीवर हा तरुण चढला होता. पोलिसांनी त्याला फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवून तब्बल २०० पायऱ्या चढून जाऊन त्याला वाचवले. हा तरुण व्यावसायिक असून त्याची वसईत कंपनी आहे.

मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने लग्न केले. त्यामुळे हा तरुण निराश झाला आणि शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी वसई पूर्वेच्या भागवत टेकडीवर आला. ही माहिती मीरा भाईंदर वसई विरार अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच सकाळी सव्वा अकरा वाजता वालीव पोलिसांना कळवले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन कर्मचारी बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली.

हा तरुण ज्या टेकडीवर होता. ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यपासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात ५ मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता. या वेळी त्याच्याशी बोलत राहणे, धीर देणे गरजेचे होते आम्ही त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले, अशी माहिती पोलीस नाईक बळीद यांनी दिली.

आमच्या दोन पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या तरुणाला बोलण्यात व्यस्त ठेवले, आणि सुमारे दोनशे पायऱ्या चढून त्या तरुणाला वाचवले,  अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.