शिक्षकांच्या मागण्यांसाठी एका शिक्षकाने आज टोकाचे पाऊल उचल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मंत्रालय परिसरातील आकाशवाणी आमदार निवसाच्या एका इमारतीवर चढून या शिक्षकाकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व पोलिसांसह अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी जमलेले आहेत. या शिक्षकाची सर्वोतोपरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हा शिक्षक ऐकण्याचा मनस्थित नसल्याचे दिसत आहे.

या शिक्षकाचे नाव नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक गजानन खैरे आहे. त्यांचे म्हणने आहे की करोना काळात आम्हाला काम मिळाले नाही, शिवाय पगार देखील मिळालेला नाही. कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही. आता मी खूप थकलेलो आहे. जिवंत असताना मला न्याय मिळाला नाही, किमान मेल्यावर तरी मला न्याय मिळू द्या, असे या शिक्षकाकडून वारंवार सांगितल्या जात आहे.

तर, या शिक्षकांची समजूत काढताना नाना पटोले म्हणाले की, मी या विषयाबद्दल एक बैठक बोलावली होती. परंतु करोना काळात निर्णय झाले नाही. तुम्ही खाली उतरा उद्याच्या उद्या तोडगा काढतो. केवळ तुम्हीच नाहीतर अन्य शिक्षकांना देखील आपण मदत करू. परंतू तुम्ही असे टोकाचे पाऊल उचलू नका. मी तुमच्यासह सर्वांना न्याय मिळवून देतो असे, त्यांनी या शिक्षकाला आश्वासन दिले आहे. मी वर येतो आपण तिथेच चर्चा करू असे देखील पटोले यांनी म्हटले आहे.

मंत्रालयाच्या बाजूला हा परिसर आहे. येथीलच आमदार निवासाच्या एका इमारतीवरून हा शिक्षक आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. अनेक वर्षांपासून वेतन मिळालं नसल्याची या शिक्षकाची तक्रार आहे. यावेळी अन्य लोकप्रतिनिधी देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्रालयात या अगोदर असा प्रकार घडला होता. आता आमदार निवासाच्या इमारतीवर असा प्रकार घडत असल्याने एकचखळबळ उडाली आहे.