पालिका कर्मचाऱ्यांना आता चेहरा दाखवून हजेरी नोंदवावी लागणार आहे. पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये तशी यंत्रणा (फेस रिडर) बसवली जाणार आहे. त्याकरीता कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.

मार्चमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागला तेव्हा पालिकेतील बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात आली. तीन महिन्यांनी ही हजेरी पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या पद्धतीमुळे संसर्गाचा धोका अधिक असल्याने कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. तसेच बायोमेट्रीक हजेरीला पर्याय आणण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यामुळे कॅमेरामध्ये चेहरा पाहून संगणकावर (फेस रिडर) हजेरी नोंदवण्याचा नवा पर्याय पुढे आला आहे. पालिकेच्या विद्युत व यांत्रिकी विभागाने तशी तयारी केली असून नायर रुग्णालयात यापूर्वी ही हजेरीची पद्धत सुरू करण्यात आली आहे.

सध्या माहिती संकलनाचे काम विभाग कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. ग्रँटरोड नानाचौक येथील पालिकेच्या डी विभाग कार्यालयात २४ नोव्हेंबपर्यंत हे माहिती संकलनाचे काम सुरू राहणार आहे.

पालिकेचे कार्यालयीन कर्मचारी, कामगार यांना ही हजेरी बंधनकारक राहणार आहे.