मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना ‘ताज’ हमॅटेलमध्ये बरोबर घेऊन जाणे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या  अंगाशी आले होते. तसाच काहीसा प्रकार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत घडला आहे. लेखक आणि दिग्दर्शक विश्वास पाटील यांच्या हट्टापायी त्यांच्या ‘रज्जो’ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यास शिंदे यांनी पाटण्यामधील बॉम्बस्फोट मालिकेनंतर हजेरी लावली आणि विरोधकांच्या टीकेचे धनी होण्याची वेळ त्यांच्यावर आली.
काही नेत्यांना बॉलीवूडचे जास्तच प्रेम आहे. चित्रपट नट वा तारकांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम ही नेतेमंडळी चुकवत नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील जाहीर सभेच्या वेळी आठ बॉम्बस्फोट झाले. त्यात सहा जण ठार झाले तर सुमारे १०० जण जखमी झाले. बॉम्बस्फोटाची तीव्रता लक्षात घेता देशभर अतिदक्षतेचा इशारा गृहमंत्रालयाकडून देण्यात आला. मात्र गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे विश्वास पाटील यांच्या चित्रपटाच्या संगीत सोहळ्यात मग्न झाले होते. पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर वास्तविक शिंदे यांनी या कार्यक्रमास जाण्याचे टाळणे आवश्यक होते. पण विश्वास पाटील यांनी हट्टच धरल्याने शिंदे यांचा नाईलाज झाला. लेखक मित्राचा हट्ट शिंदे यांना मोडवेनासा झाला, पण त्यावरून टीकेच धनी व्हावे लागले.
पाटण्यातील स्फोटानंतर आपण संगीत कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असलो तरी तेथील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत होतो. या कार्यक्रमातूनही आपण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. विश्वास पाटील यांना शब्द दिल्यानेच आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे यांनी उपस्थितीचे समर्थन केले असले तरी  विश्वास पाटील यांच्यामुळे त्यांच्यावर आफत न येवो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.