मुंबईकरानो, बातमीचा मथळा वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील, पण वृत्त खरं आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील काही स्टेशनवरील प्लॅटफार्मच्या तिकीटांमध्ये रेल्वेनं भरमसाट म्हणजे पाचपट वाढ केली आहे. २४ फेब्रवारी रोजी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जूनपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. सीएसएमटी, दादर, एलटीटी या स्थानकांसह काही निवडक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे या स्टेशनवर जाण्याआधी खिशाचा विचार करण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.

मध्य रेल्वेनं मुंबई महानगर क्षेत्रातील काही महत्त्वाच्या रेल्व स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यात करोनाचा धोका असल्यानं रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जूनपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ‘पीटीआय’शी बोलताना दिली.

मुंबई महानगर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड स्टेशन या स्थानकांचं प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आलं आहे. पूर्वी या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये होते. या रेल्वे स्टेशनवर नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं आणि कोविडचं संक्रमण अजूनही कमी झालेलं नाही. त्यामुळे गर्दी होणाऱ्या या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्यात आल्याचं सुतार यांनी सांगितलं.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असली तरी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये इमारतीतील रुग्णांचे प्रमाण जास्त असून झोपडपट्टय़ा व चाळीतील रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुंबईत सध्या प्रतिबंधित इमारतीच्या तुलनेत प्रतिबंधित झोपडपट्टय़ांचे प्रमाण खूपच कमी आहे. १ मार्चच्या आकडेवारीनुसार १३७ इमारती प्रतिबंधित आहेत. तर के वळ १० झोपडपट्टय़ा प्रतिबंधित आहेत.