15 July 2020

News Flash

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीकडे लक्ष

मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांवर राज्यपाल शिक्कामोर्तब करण्याची अजिबात शक्यता नाही.

संग्रहित छायाचित्र

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची मुदत येत्या शनिवारी संपुष्टात येत असल्याने नव्या १२ आमदारांची नियुक्ती लवकरच करता येईल. अर्थात, राज्यपाल आणि महाविकास आघाडी नेत्यांचे संबंध लक्षात घेता,  मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांवर राज्यपाल शिक्कामोर्तब करण्याची अजिबात शक्यता नाही.

राज्यसभा आणि विधान परिषद या वरिष्ठ सभागृहांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा देश किं वा राज्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची घटनेतच तरतूद करण्यात आली. यानुसार राष्ट्रपती राज्यसभेवर तर राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करतात.

महाराष्ट्र विधान परिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्माण झालेल्या कटुतेमुळे राज्यपाल सहजासहजी सरकारने सुचविलेल्या नावांना मंजुरी देण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला. तर दोन रिक्त जागा भरण्याकरिता राष्ट्रवादीने शिफारस केली असता मंत्रिमंडळाने शिफारस के लेली नाही आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे या कारणावरून नियुक्ती करण्यास राज्यपालांनी नकार दिला होता.

कोणाची नियुक्ती होऊ शकते?

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करता येते याबाबत घटनेच्या १७१ (५) कलमात तरतूद करण्यात आली आहे. वाङ्मय, विज्ञान, कला, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्यांची राज्यपाल नियुक्ती करू शकतात, असे घटनेत म्हटले आहे.

प्रत्येक वेळी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीनंतर वाद निर्माण होतात. सदस्यांच्या निवडीला आव्हान दिले जाते. पण सहा वर्षांची मुदत संपली तरी न्यायालयात याचिका प्रलंबित राहते. सामाजिक कार्य या घटनेतील तरतुदीचा सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच दुरुपयोग केला जातो, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोणाच्या वाटय़ाला किती जागा ?

शिवसेना-भाजप युती किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड करताना निम्म्या जागांची वाटणी करण्यात आली होती. या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. यामुळे प्रत्येकी चार जागा वाटून घेणार की शिवसेना-राष्ट्रवादी जादा वाटा घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. करोनाचे संकट कमी झाल्यावर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

हे सदस्य शनिवारी निवृत्त

* जनार्दन चांदूरकर (काँग्रेस)

* हुस्नबानू खलिफे  (काँग्रेस)

* आनंदराव पाटील (काँग्रेस)

* अनंत गाडगीळ (काँग्रेस)

* रामहरी रुपनवर (काँग्रेस)

* प्रकाश गजभिये (राष्ट्रवादी)

* विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)

* ख्वाजा बेग (राष्ट्रवादी)

* जगन्नाथ शिंदे (राष्ट्रवादी)

* जोगेंद्र कवाडे (पीपल्स रिपब्लिकन)

दोघांचे राजीनामे

राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते या राष्ट्रवादीच्या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश के ल्याने आमदारकीचा राजीनामा दिला. यापैकी राहुल नार्वेकर हे विधानसभेवर निवडून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:16 am

Web Title: attention to the selection of mlas appointed by the governor abn 97
Next Stories
1 २५ हजार रहिवाशांचे स्थलांतर
2 चित्रीकरण ठप्प असले तरी चित्रनगरी सुरूच
3 माहीम कोळीवाडय़ातील रहिवाशांचा स्थलांतराला नकार
Just Now!
X