News Flash

जिजामाता उद्यानातील पेंग्विनच्या आकर्षणाला ओहोटी

जिजामाता उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा तब्बल पाच लाखांनी घट झाली आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रवेश शुल्कवाढीमुळे महसुलात वाढ, तर पर्यटकांत पाच लाखांनी घट

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात आणलेल्या पेंग्विनचे कुतूहल आता संपले आहे. पेंग्विन दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या तीन वर्षांत घटली आहे.

जिजामाता उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा तब्बल पाच लाखांनी घट झाली आहे. पेंग्विनचे कमी झालेले आकर्षण आणि उद्यानाच्या प्रवेशशुल्कातील भरमसाठ वाढ यामुळे पर्यटक जिजामाता उद्यानाकडे पाठ फिरवू लागले आहेत. असे असले तरी प्रवेशशुल्क वाढवल्याने महसुलात मात्र वाढ झाली आहे.

थंड प्रदेशातील पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना व्हावे यासाठी पालिकेने जिजामाता उद्यानात २०१६मध्ये पेंग्विन आणले. त्यांना पाहण्यासाठी सुरुवातीला पर्यटकांच्या आणि  मुंबईकरांच्या रांगा लागत होत्या. सुरुवातीला केवळ दोन ते पाच रुपये प्रवेशशुल्क घेतले जात होते. मात्र ऑगस्ट २०१७ पासून पालिकेने भरमसाठ शुल्कवाढ केली. १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी ५०, लहान मुलांसाठी २५ आणि चौघांच्या कुटुंबासाठी १०० रुपये एवढे प्रवेशशुल्क घेतले जाऊ लागले. परिणामी गेल्या दोन वर्षांत जिजामाता उद्यानाचा महसूल चांगलाच वाढला. वार्षिक उत्पन्न ७३ लाखांवरून पाच कोटींवर गेले आहे. परंतु, या वर्षी पर्यटकांची संख्या पाच लाखांनी कमी झाली आहे.  उद्यानाच्या प्रवेश शुल्कवाढीमुळे पर्यटकांची संख्या घटली आहेच, पण प्राणिदर्शनासाठी येणाऱ्यांचीही निराशा होत आहे. केवळ पेंग्विन किंवा प्राणिदर्शनासाठीच पर्यटक उद्यानात येत नव्हते, तर अनेक जण उद्यानातील झाडांच्या सावलीत वेळ व्यतीत करण्यासाठीही येत असत. आता त्यासाठी ते १०० रुपये मोजायला तयार नाहीत.

प्रवेशशुल्क वाढवल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली हे खरे आहे. परंतु, आता खरेखुरे, ज्यांना प्राणिसंग्रहालय पाहण्यात रस आहे असेच पर्यटक येत आहेत.

सध्या जिजामाता उद्यानात १७ प्राण्यांच्या पिंजऱ्यांची दुरुस्ती सुरू आहे. आता फक्त हरीण पाहता येते.

पक्ष्यांचे पिंजरे आणि वाघांच्या बछडय़ांचे पिंजरे पर्यटकांना खुले केलेले नाहीत, असे उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:21 am

Web Title: attractions of penguins in the jijamata garden
Next Stories
1 दोन दशकांनंतरही अस्तित्वाची धडपड
2 फुलपाखरांना मराठी ओळख
3 अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होणार !
Just Now!
X