शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील… तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे संजय राऊत कर नाही त्याल डर असायचं कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या. भाजपावर हेतूवार आरोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा. कंपाउंडरकडून औषध घेताय आता एमडी डॉक्टरकडून घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल.” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसेच, “संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन करताय. चांगले आहे लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे. असं देखील भातळखर म्हणाले आहेत.”

तर, “बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“धनुष्यबाण ते हवाबाण! पुरावे द्या आणि मोकळे व्हा, कर नाही त्याला डर कशाला?”

तसेच, “भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. भाजपाची काही माकडं अकारण उड्या मारत आहेत” असं संजय राऊत यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं.

ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने  वर्षा राऊत यांना काल नोटीस पाठवल्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला.