भाजयुमो पदाधिकाऱ्याचा तक्रारीनंतर राजीनामा

मुंबई : भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या कार्यालयात पक्षाच्या विविध उपक्रमांची सर्वांसमोर खिल्ली उडवली आणि केंद्रातील व महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषेत विधाने के ली. इतकेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही त्यांनी अनुचित शब्द वापरल्याची तक्रार भाजयुमोचे मुंबई उपाध्यक्ष आशुतोष ठाकर याने मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच अशा गोष्टींमुळे निराश होऊन पक्षाचा राजीनामा देत असल्याचेही ठाकर याने म्हटले आहे.

मुंबई भाजयुमोच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अतुल भातखळकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी गप्पांमध्ये भातखळकर यांनी सर्वांसमोर भाजपची वॉर रूम, समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी मोहिमा या पक्षाच्या विविध उपक्रमांची चेष्टा करत त्यावर टीका केली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील व केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दलही त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही त्यांनी अनुदार उद्गार काढले. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे नव्हे तर आपल्या कामाच्या आधारावर निवडून आलो असा त्यांचा सूर होता. स्थानिक नगरसेविकेलाही आपल्यामुळेच उमेदवारी मिळाली असा त्यांचा दावा होता. माझ्याशीही त्यांचे वर्तन फारसे चांगले नव्हते. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कामामुळे मी भाजपमध्ये आलो होतो. पण भातखळकर यांनी मला दिलेली वागणूक व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल त्यांची भाषा ही निराशाजनक आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे, असे आशुतोष ठाकरे याने मंगलप्रभात लोढा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर हे पत्र ट्विटरद्वारे प्रसारित केले आहे.

आशुतोष ठाकर यांच्या आरोपांबाबत बाजू जाणून घेण्यासाठी अतुल भातखळकर यांच्याशी संपर्क  साधला असता, माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. या विषयावर आणखी काहीही भाष्य करायचे नाही, असे भातखळकर यांनी सांगितले.