अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नव्याने समन्स बजावले आहे. त्यानुसार, ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना ईडीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या अगोदर पीएमसी बँक घोटळ्याची चौकशी करण्यासाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले होते. या मुद्यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी वायकरांवर निशाणा साधला आहे.

“भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला.” अशा शब्दांमध्ये भातखळखर यांनी ट्विट केलं आहे. तसेच, या ट्विटसोबत वायकर यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेले पत्र देखील जोडण्यात आलं आहे.

वर्षा राऊत यांना ईडीने यापूर्वी देखील समन्स बजावले होते आणि २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत यांनी ईडीकडे थोडा वेळ मागितला होता. त्यांची ही विनंती स्विकारत ईडीने पुन्हा नव्याने समन्स पाठवत ५ जानेवारी पूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा समन्स; ‘या’ दिवशी होणार चौकशी

वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली होती. तेव्हा त्यांच्या टीकेला देखील अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

“संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील… तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे संजय राऊत कर नाही त्याल डर असायचं कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या. भाजपावर हेतूवार आरोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा. कंपाउंडरकडून औषध घेताय आता एमडी डॉक्टरकडून घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल.” असं भातखळकर यांनी म्हटलं होतं.

“धनुष्यबाण ते हवाबाण! पुरावे द्या आणि मोकळे व्हा, कर नाही त्याला डर कशाला?”

तसेच, “एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी चोरले आहे. एचडीआयएल आणि प्रवीण राऊत परिवाराचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक संबंध आहेत, व्यवहार आहेत. प्रवीण राऊत परिवार आणि संजय राऊत परिवाराचे पण आर्थिक व्यवहार व विशेष संबंध आहेत. संजय राऊत परिवार, प्रवीण राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा कुठून आला? कॅश ट्रेल, मनी ट्रेल पीएमसी बँकेचा एचडीआयएलच्या मार्गाने पैसा कुठून कुठं गेला? याचा तपास तर व्हायलाच हवा.” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे.