‘क्रीस’च्या उदासीन धोरणावर रेल्वे अधिकाऱ्यांची टीका; प्रचलित एटीव्हीएमलाच प्राधान्य

तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काढण्याचे विविध पर्याय रेल्वेने उपलब्ध करून दिले असले, तरी त्यातील अत्यंत सोपा पर्याय मात्र लाल फितीच्या कारभारात अडकला आहे. एक कळ दाबताच नियोजित टप्प्यापर्यंतचे तिकीट प्रवाशांच्या हाती देण्याची क्षमता असलेले ‘हॉट की एटीव्हीएम’ यंत्र ‘क्रीस’च्या उदासीन धोरणामुळे अडकून पडल्याची टीका रेल्वे अधिकाऱ्यांकडून होत आहे. तर, ‘हॉट की एटीव्हीएम’ऐवजी साधी एटीव्हीएम यंत्रे किंवा कॅश कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम यंत्रे जास्त फायद्याची असल्याचा दावा ‘क्रीस’कडून केला जात आहे.

रेल्वेच्या तिकीट यंत्रणेत तंत्रज्ञानाच्या मदतीने आमूलाग्र बदल करण्याची जबाबदारी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम (क्रीस) या संस्थेकडे आहे. या संस्थेने एटीव्हीएम यंत्रे, कॅश कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम यंत्रे, मोबाइल तिकीट प्रणाली आदींच्या माध्यमातून प्रवाशांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तरीही मध्य रेल्वेवरील तिकीट विक्रीपैकी ६५ टक्के विक्री अजूनही तिकीट खिडक्यांवरून होते. तर एटीव्हीएम, जेटीबीएस प्रणालीवरून उर्वरित तिकिटे विकली जातात. एटीव्हीएम यंत्राद्वारे तिकीट काढण्याची प्रक्रिया सर्वसामान्यांना समजण्यास अवघड असल्याने अद्यापही एटीव्हीएमने म्हणावी तशी पकड घेतलेली नाही.

या दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांकडून क्रीसला हॉट की एटीव्हीएमचा पर्याय सुचवण्यात आला होता. उपनगरीय रेल्वेमार्गावर असलेल्या तिकिटाच्या टप्प्यांनुसार पाच, दहा, पंधरा या शुल्कांची बटणे या एटीव्हीएमवर असतील.

प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या टप्प्याएवढे पैसे भरून हे तिकीट काढण्यासाठी केवळ एक बटण दाबायचे आहे. ही संकल्पना सर्वसामान्यांनाही कळणारी असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याचा आग्रह धरला होता. मात्र क्रीसने अद्याप प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीची चाचणी घेण्यासाठी एकही यंत्र तयार केलेले नाही.

कंपनीने उत्पादनात रस दाखविण्याची गरज

एखादी नवीन प्रणाली प्रवाशांच्या सेवेत आणण्याआधी तीन ते चार प्रकारची यंत्रे तयार करून त्यांची चाचणी घेतली जाते. हॉट की एटीव्हीएम यंत्रे तयार करण्यासाठी प्रत्येक यंत्रामागे सहा ते सात लाख रुपयांचा खर्च येतो. म्हणजेच चार यंत्रे तयार करण्यासाठी क्रीसला २४ ते २८ लाख रुपयांचा खर्च आहे. मात्र ही यंत्रे तयार झाल्यानंतर ती यशस्वी ठरल्यास निविदा प्रक्रिया काढली जाते. त्यामुळे सुरुवातीची यंत्रे विकसित करणाऱ्या कंपनीला उत्पादनाची शाश्वती राहत नाही. त्यामुळे क्रीसनेच या उत्पादनांत रस दाखवण्याची गरज रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत.