मालमत्ताधारकांच्या ४२ भूखंडांचा पालिकेकडून लिलाव; २१० कोटी थकवणाऱ्या विकासकांवर कारवाई

मुंबई : मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांकडून करवसुली करण्यासाठी पालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत ११ हजार ६६१ ठिकाणी अटकावणी म्हणजेच मालमत्तांना टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे, तर  ४७९ ठिकाणची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. अनेक करबुडव्यांचे वाहन आणि कार्यालयातील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या वर्षी प्रथमच स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असून ४२ भूखंडांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची गेल्या किमान दहा वर्षांपासूनची संचित थकबाकी तब्बल १९ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. यात खासगी कंपन्या आणि विकासक यांची थकबाकी मोठय़ा प्रमाणावर आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने ८ मार्चपासून कंबर कसली आहे. ही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्ती, अटकावणी व वस्तूंचा लिलाव, अशी कारवाई केली जात आहे. तसेच दर महिन्याला दोन टक्के  दराने दंड आकारण्यात येत आहे. यापूर्वी थकबाकीदारांना केवळ नोटीसा धाडणे, पाणी तोडणे, जप्ती अशी कारवाई केली जात होती. गेल्या वर्षीपासून प्रथमच पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने थकबाकीदारांच्या कार्यालयातील चल मालमत्ता (गाडी, टीव्ही, फ्रीज) जप्त व लिलाव करण्यास सुरुवात केली.

बडय़ा थकबाकीदारांची विशेषत: विकासकांची थकबाकी वसूल करण्यासाठी स्थावर मालमत्तांवर जप्तीची कारवाई आणि लिलाव करता यावा याकरीता प्रशासनाने यावर्षी तयारी सुरू केली आहे. बडय़ा थकबाकीदारांच्या मालकीच्या मोकळ्या जमिनी, बांधकामाखालील जमीन यांचाही लिलाव यावर्षीपासून करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत ४२ भूखंडांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या जमिनींचा लिलाव

भूखंडाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केलेल्या मालमत्ताधारकांकडून पालिकेला २१० कोटी रुपये येणे आहे. यात प्रामुख्याने मे. सुमेर  असोसिएटर यांच्याकडे ५३. ४३ कोटी, मे. सुमेर बिल्डर प्रा . लि कडे २९.७१ कोटी , मे. लोखंडवाला कोठारीयाकडे १३.५५ कोटी, वंडरव्हॅल्यू रियलिटी डेव्हलपर लिमिटेडकडे १४. ६५ कोटी थकित आहेत. या सर्व थकबाकीदारांकडून थकीत कर वसूल करण्यासाठी भूखंडाच्या लिलावाची प्रक्रिया पालिके ने सुरू के ली आहे. जे मालमत्ताधारक वारंवार विनंती करून व नोटीस बजावूनही मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांची जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने-वातानुकूलन यंत्रणा यांसारख्या महागडय़ा वस्तू जप्त करणे यांसारखी कारवाई केली जात आहे.

आतापर्यंतची कारवाई

वांद्रे पूर्व परिसरातील मे. एमआयजी सहकारी गृहरचना संस्था (विकासक मे. डी.?बी. रिएॅलिटी) यांच्यावर ६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांचे वाहन जप्त करून स्थानबद्ध करण्यात आले आहे. वांद्रे पूर्व परिसरातील एका बहुमजली इमारतीत मे. महाराष्ट्र थिएटर प्रा. लि.(मे. आर एन ए कॉर्पोरेट) यांच्याकडे २१ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी होती. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आले असून तळमजल्यावर अटकावणीची कार्यवाही करण्यात आली आहे.

यंदा १४०० कोटींची तूट

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये पाच हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर जमा करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असून १८ मार्चपर्यंत रुपये तीन हजार ८०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. ३१ मार्चपर्यंत पालिके ला उर्वरित १४०० कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे.