पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य फरारी आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदी याच्याकडील जप्त केलेल्या महागडय़ा चित्रांचा लिलाव करण्यास मुंबईतील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.

मोदीकडून जप्त करण्यात आलेल्या या चित्रांमध्ये व्ही. एस. गायतोंडे, एम. एफ. हुसैन, के. के. हेबर, अँजोली इला मेनन, विश्वनाथ नागेश्वर, नंदलाल बोस आणि विवान सुंदरम् यांच्या चित्रांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोदी याची १४७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यात या चित्रांचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत मोदीकडील जप्त केलेल्या या चित्रांच्या लिलावासाठी परवानगी देण्याची मागणी ‘ईडी’ने केली होती. प्राप्तिकर खात्यामार्फत हा लिलाव करण्यात येणार असून त्यांना तो करण्यास परवानगी देण्याची मागणी ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सलमान आझमी यांनी ईडीची ही मागणी मान्य करीत मोदीकडील जप्त केलेल्या चित्रांच्या लिलावास हिरवा कंदील दाखवला.