04 March 2021

News Flash

पाल्र्याच्या दीनानाथ नाटय़गृहाची डागडुजी सुरूच

चार महिन्यांनंतरही कामे अपूर्ण राहिल्याने नाराजी

चार महिन्यांनंतरही कामे अपूर्ण राहिल्याने नाराजी

मुंबई : डागडुजीला दिरंगाई होत असल्याने विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहामध्ये प्रेक्षक, कलाकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून प्रसाधनगृह, रंगभूषा कक्ष आदींची दुरुस्ती सुरू आहे. किरकोळ कामाला चार महिने वेळ लागतो का, असा सवाल निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. ‘पालिका आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा भुर्दंड निर्मात्यांना भरावा लागत आहे,’ असा आरोप निर्माते दिलीप जाधव यांनी केला आहे.

शिथिलीकरणानंतर नाटय़गृह सुरू करताना बहुतांशी नाटय़गृहांमध्ये डागडुजीचे काम करण्यात आले. दीनानाथ नाटय़गृहातील महिला रंगभूषा कक्ष, दुसऱ्या मजल्यावरील प्रसाधनगृह, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा कक्ष यांच्या दुरुस्तीचे काम करोनापूर्वीच मंजूर करण्यात आले होते. त्या कामाला शिथिलीकरणानंतर नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली. परंतु चार महिने झाले तरी ही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रेक्षक, कलाकारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

याचा थेट परिणाम नाटय़ व्यवसायावर होत असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. ‘नाटक पाहण्यासाठी  येणाऱ्या प्रेक्षकांची प्रसाधनगृह ही प्राथमिक गरज असते. एक प्रसाधनगृह बंद असल्याने दुसऱ्या प्रसाधनगृहात गर्दी होते. हे असेच होत राहिले तर प्रेक्षक दीनानाथमध्ये फिरकणार नाहीत. त्याचा थेट परिणाम नाटय़ व्यवसायावर होईल.’ अशी खंत निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केली.

‘प्रसाधनगृहाबाबतच प्रेक्षकांच्या अधिक तक्रारी आहेत. उद्या जर पूर्ण क्षमतेने प्रेक्षक आले तर मोठी तारांबळ उडेल. काम कासवगतीने सुरू असल्याने  नाटय़गृहाच्या आवारात रेती, माती, विटा यांचा ढीग पडलेला आहे. त्यामुळे लोकांना वाहने उभी करण्यासाठीही अडचण येत आहे. नाटय़गृह प्रशासनाला कंत्राटदार  जुमानत नाही,’ अशी माहिती तेथील रंगमंच कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली.

‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे सध्या दीनानाथमध्ये प्रयोग सुरू आहेत. तेथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा त्रास होत असल्याचे अभिनेत्री मानसी जोशी हिने सांगितले. ‘महिला रंगभूषा कक्षाचे काम सुरू असल्याने एकच प्रसाधनगृह महिला आणि पुरुषांमध्ये विभागून दिले आहे. दारांच्या कडय़ा तुटलेल्या आहेत, जिथे बघावे तिथे धूळमाती असते, प्रसाधनगृहातील खिडक्यांना काचा नाहीत, बाहेरील माणूस सहज प्रसाधनगृहात डोकावू शकतो.’ असा तक्रारीचा पाढा तिने वाचला. ‘नाटकाचा प्रयोग सुरू असतानाही दुरुस्तीचे काम सुरू असते. तिथल्या आवाजाचा परिणाम प्रयोगावर होतो,’ अशी तक्रार कलाकारांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात नाटय़गृहाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, तर पालिका अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:24 am

Web Title: audience artists face difficulties in master dinanath mangeshkar natyagriha zws 70
Next Stories
1 ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांसाठी पालिके चे ५० कोटी
2 ‘मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घ्यावा’
3 निकिता जेकबच्या जामिनावर आज निर्णय
Just Now!
X