राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करुन ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना शनिवारी गौरविण्यात आले. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे उपस्थित रसिकांच्या मनात संताप खदखदत होता. या संतापाला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी वाट मोकळी करुन देताच त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
वादक ते संगीतकार अशा ४० वर्षांच्या प्रवासात ११५ मराठी चित्रपट, २५० हून अधिक नाटय़े, मालिकांची शीर्षकगीते आणि पाच हजारांहून अधिक जाहिरातींसाठी अतूट गोडीचे संगीत देणाऱ्या अशोक पत्की यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकाराला लता मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घातला. परंतु प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यास पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार अनुपस्थित होते. ‘कलाकारांना शासनाचा आश्रय महत्त्वाचा असतो. मराठी संगीत क्षेत्रातील अशोक पत्की यांच्यासारख्या अभिमानास्पद व्यक्तीसाठी तरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी थोडा वेळ काढायला हवा होता, अशी खंत वाडकर यांनी व्यक्त करताच रसिकांनी त्यास दाद दिली.
अशोक पत्कींच्या स्वभावातला हा विनम्रपणा, त्यांच्या संगीतातला गोडवा आणि त्यांच्या जीवनप्रवासातला सच्चेपणा यामुळे रसिक प्रेक्षक भारावून गेले. तरीही त्यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकाराला पुरस्कार देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही, असे वाडकर म्हणाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सरकारी कार्यक्रमातील फोलपण पुन्हा एकदा उघडकीस आला.
संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यावर्षी अशोक पत्की यांना पालकमंत्री जयंत पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र नाटय़ मंदिरात शनिवारी झालेल्या सोहळ्यात अशोक पत्की यांना पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान, खासदार एकनाथ गायकवाड, मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, संगीतकार आनंदजी, रवींद्र जैन आणि ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अशोक पत्की यांचा आजवरचा संगीत प्रवास त्यांच्या मुलाखतीतून आणि गाण्यांतून उलगडत गेला.
गाण्यातले भावमाधुर्य जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत त्या गाण्याचे आयुष्य वाढत जाते. हे लक्षात घेऊन गेली ४० वर्षे मी संगीतकार म्हणून काम केले. माझ्या आयुष्यात लाभलेले गुरू आणि मार्गदर्शकांना गुरुदक्षिणा देण्यासाठी मी मनापासून काम करीत गेलो. माझ्यासाठी गाणी करताना, लोकांसाठीही संगीत दिले तर ते संगीत कायम जपले जाणार आहे, हा भाव मनी होता. त्यामुळे आज लतादीदींच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे साक्षात सरस्वती दीदीने पाठीवर दिलेली थाप आहे, या शब्दांत पत्की यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.