11 August 2020

News Flash

आजच्या टीव्ही मालिकांचा प्रेक्षक दोन दशके मागे

वीस वर्षांपूर्वी, उपग्रह वाहिन्यांच्या उदयकाळात आलेल्या बोल्ड नायिकाप्रधान मालिकांची जागा आता सोशिक, दुखी नायिकांनी घेतली आहे.

| September 26, 2013 01:29 am

वीस वर्षांपूर्वी, उपग्रह वाहिन्यांच्या उदयकाळात आलेल्या बोल्ड नायिकाप्रधान मालिकांची जागा आता सोशिक, दुखी नायिकांनी घेतली आहे. आजचे प्रेक्षक काळाच्या वीस वर्षे मागे आहेत, असे वास्तव टीव्ही-चित्रपट निर्माती अश्विनी यार्दी यांनी बुधवारी परखडपणे मांडले. ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावर, पु. ल. देशपांडे कला अकादमीत बुधवारी वाचकांशी संवाद साधताना त्यांनी टीव्ही मालिकांच्या कथेमागची कथा, निर्मितीचे अर्थकारण, चित्रपटनिर्मिती, मराठी चित्रपटांबाबतची भूमिका उलगडून दाखवली.
उपग्रह वाहिन्यांवरून सुरुवातीच्या काळात दाखविल्या जाणाऱ्या मालिकांचा प्रेक्षकवर्ग समाजातील उच्चशिक्षितांचा होता. त्यामुळे तेव्हा हसरतें, तारा अशा मालिकांमधून बोल्ड नायिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या. सन २००० नंतर उपग्रह वाहिन्या सर्वदूर पसरल्या. शहरीच नव्हे तर निमशहरी ग्रामीण भागातील प्रेक्षकांना समोर ठेवून मालिका बनवणे क्रमप्राप्त ठरले. आज बोल्ड नायिकांना प्रेक्षकवर्ग नाही. मालिकांमधील नायिका या मान खाली घालून राहणाऱ्या, दुख सहन करणाऱ्या व सोशिक रंगवल्या जात आहेत, असे यार्दी म्हणाल्या. भरजरी कपडय़ांमध्ये घरात वावरणाऱ्या, किचनमध्ये सतत राबणाऱ्या, स्वयंपाक बनवत राहणाऱ्या, कुटुंबियांमध्ये आग लावत असलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीनुसार दाखवल्या जातात. त्यांच्यात बदल केलेला प्रेक्षकांना रुचत नाही. वेगळ्या विषयांवरील, गंभीर मालिका आपटतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. किचनमध्ये तयार होणाऱ्या पदार्थाची प्रक्रिया विचारणारे, सोफासेटचे कौतुक करणारे आणि भिंतीवरील चित्र का बदलले याची चौकशी करणारे अनेक फोन आणि पत्रे येत असतात. ‘बालिका वधू’मध्ये सुगणाचा नवऱ्याच्या मृत्यूची चाहूल लागल्यावर माझ्या कार्यालयातील फोन खणखणू लागले. लोक प्रचंड चिडले होते. फोन बंद करण्याची वेळ आली. आता उद्यापासून ही मालिका आपटणार असे मला वाटले. दुसऱ्या दिवशी त्या भागाचा सर्वात जास्त टीआरपी मिळाला होता.
आजोबा बाबुराव पै यांनी प्रभातच्या संस्थापकांपैकी एक तर पुण्याच्या प्रभात टॉकीजमध्ये केवळ मराठीच चित्रपट दाखवण्याचा निर्णय वडलांनी अखेरपर्यंत कायम ठेवला. त्यामुळे त्यांच्यासाठी मराठी चित्रपट काढायचा असे मी ठरवले. टीव्हीसाठी काम करताना ते शक्य नसल्याने राजीनामा दिला आणि ‘७२ मैल एक प्रवास’ चित्रपट आला. हिंदी चित्रपटांसाठी वेगळ्या पटकथेच्या शोधात असताना ‘ओह माय गॉड’ची कथा परेश रावल यांनी ऐकवली. आता ‘ओह माय गॉड’चा दुसरा भाग तयार करायचा आहे. मात्र देवाला न्यायालयात आणल्यावर आता पुढे काय, असा प्रश्न पडलाय, त्यासाठी पटकथेच्या शोधात आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2013 1:29 am

Web Title: audience of the tv serial is behind two decades ashvini yardi
टॅग Viva Lounge
Next Stories
1 व्हिडिओ : ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’च्या सेटला आग
2 रेसकोर्सवर आता थीम पार्क
3 महिलांसाठी स्वच्छतागृहांचे धोरण लवकरच
Just Now!
X