प्रेक्षकांना अजूनही मालिकांमधील स्त्रीची ‘गोड-गोड ’ प्रतिमा आवडते आणि त्यामुळेच मालिकांमधून सातत्याने तशाच प्रकारच्या प्रतिमा दाखविण्यात येतात. मालिकांच्या कथानकात अनेक चांगल्या कल्पना मांडता येऊ शकतील, पण त्यासाठी प्रेक्षकांची अभिरुची परिपक्व होणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी व्हिवा लाउंजमध्ये व्यक्त केले. पंढरपूरमधील सामान्य घरातील मुलीचा प्रथितयश लेखिका आणि अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमात उलगडला. ‘दिशा डायरेक्ट’च्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मालिकेत आदर्श मुलीची प्रतिमाच प्राधान्याने दाखविण्यात येते. तिच्या शिक्षणापासून ते सासरी जाण्यापर्यंतचा प्रवास यावरच मालिकेचे कथानक अवलंबून असते. पण त्याही पलीकडे आपल्या आजूबाजूच्या वास्तवात सुंदर माणसे आणि सुंदर आयुष्ये असतात. त्यामधील गमतीजमती सुंदर पद्धतीने मांडता येऊ शकतात. तसा प्रयत्न आतापर्यंत मालिकांमधून फार कमी प्रमाणात करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या. मालिकांमधील तोचतोचपणाबद्दल प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना मधुगंधा म्हणाल्या, मुळात मालिका निर्मिती हा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाची स्वतंत्र गणिते असतात. एखादी मालिका बनविण्यापूर्वी वाहिनीकडून सर्वेक्षण आणि अभ्यास करूनच प्रेक्षकांच्या पसंतीचा अंदाज बांधला जातो. एखादी मालिका एका वर्षांत संपवावी किंवा आपण त्यातून हात काढता घ्यावा असे माझे पूर्वी स्पष्ट मत होते. पण ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने माझे हे मत बदलले. या मालिकेला पहिल्या वर्षांच्या तुलनेत दुसऱ्या  वर्षी जास्त टीआरपी होता, असे त्यांनी सांगितले.
आज मराठीमध्ये हजारामध्ये एक लेखक सापडतो पण त्याने लिहिलेले पात्र साकारायला हजार मुली तयार असतात, त्यामुळे लेखकाला मागणी आहे. हे तरुण लेखकांना जाणवले पाहिजे. असे सांगतानाच मधुगंधा म्हणाल्या, त्यात लेखकांना माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे पैसा असेल तिथे ते वळतात. तरुणांना आपलेसे वाटेल असे नाटक हल्ली लिहिले जात नाही. त्यामुळे नाटकांचा प्रेक्षकवर्गही मर्यादित झाला आहे.

‘..तर मालिका बघू नका’
मालिकेचे कथानक संपले असल्याचे तुम्हाला माहीत असूनही ती खेचण्याचा प्रयत्न का केला जातो, या प्रश्नाचे उत्तर देताना, मधुगंधा म्हणाल्या, मालिका आवडत नसेल तर वाहिनी बदला किंवा सरळ टीव्ही बंद करून तुमच्या घरातील लोकांशी बोला. काय बघू आणि काय बघू नये याचा पर्याय प्रेक्षक म्हणून तुमच्याच हातात असतो. तो तुम्ही नक्कीच वापरू शकता.