पर्यटनाच्या दृष्टीने सुवर्णकाळ असलेल्या नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये भटकंतीसाठी भारतीय पर्यटकांचा ओढा युरोप, ऑस्ट्रेलियासारख्या आत्तापर्यंत महागडय़ा समजल्या जाणाऱ्या देशांकडे वाढला आहे. तसेच पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने अनेक देशांनी भारतात सुरू केलेल्या प्रसिद्धी योजना, खास पॅकेजेस आणि तुलनेने स्वस्त झालेला हवाईप्रवास यामुळे पर्यटकांनी जागतिक नकाशावर नवनवीन देश शोधायला सुरुवात केली असून इस्रायल, कंबोडिया अशा पर्यटनासाठी फारशा प्रसिद्ध नसलेल्या देशांकडे भारतीय पर्यटक मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होऊ लागले आहेत.

आपल्याकडे युरोप-अमेरिका ही टूर म्हणजे निवृत्त झाल्यानंतर गुंतवलेल्या पैशातून पूर्ण करायची योजना हे समीकरण आत्तापर्यंत रुढ होते. आर्थिक उत्पन्नातील वाढ आणि थायलंड-मलेशिया-बँकाक असे जवळचे देश फिरून कंटाळलेले पर्यटक नवीन देशांच्या शोधात आहेत, अशी माहिती ‘मँगो टुर्स’चे मिलिंद बाबर यांनी दिली. युरोपमध्ये या दोन महिन्यांत थंडी असते, याच दोन महिन्यांत तिथे जाण्यासाठी हवाई तिकिटे खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे युरोप आणि डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवडय़ात सिडनी बंदरावर नववर्षांच्या स्वागताचा सोहळा पाहण्यासाठी जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या मोठी असल्याचे ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज’चे प्रमुख करण आनंद यांनी दिली. तर सियाचेल्स, मालदीव आणि मॉरिशस ही मधुचंद्राला जाणाऱ्या जोडप्यांची आवडती ठिकाणे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी रुपयाच्या तुलनेत डॉलर, युरोचा भाव वधारला होता. त्यामुळे युरोप-अमेरिका, ऑस्ट्रेलिया या आधीच खर्चीक असलेल्या टूर्स परवडेनाशा झाल्या होत्या. मात्र चीनच्या चलनात वाढ झाली नव्हती. त्यामुळे एक लाख रुपयात १०-१२ दिवसांची चीनवारी पर्यटकांना परवडणारी असल्याने गर्दी वाढली होती, असे बाबर यांनी सांगितले. या वेळी पर्यटकांची गर्दी युरोप-अमेरिका, ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्स अशा ठिकाणी २० ते २५ टक्के भारतीय पर्यटकांची वाढ अपेक्षित आहे.

इस्रायल, कंबोडियाला ओढा

इस्रायल हा पर्यटकांच्या नकाशावरचा नवा देश ठरला आहे. इस्रायल हे धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध असल्याने तिथे यात्रेसाठी लोक जात होते. पण इस्रायलमध्ये केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर ऐतिहासिक वास्तू, संग्रहालय, बीचेस, रिसॉर्ट्स अशा अनेक गोष्टी एकाच ठिकाणी असल्याने तिथे लोकांचा कल वाढतो आहे. गेल्या वर्षी ४० हजार भारतीय पर्यटकांनी इस्रायलला भेट दिली होती, असे ‘इझीगो १’च्या संचालिका नीलू सिंग यांनी सांगितले. पूर्व आशियाई देशांमध्ये कंबोडियाला भेट देणारे वाढतातहेत. तिथेही गेल्या वर्षी १९०० भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. कंबोडिया, व्हिएतनाम प्रवास तुलनेने स्वस्त आहे आणि कमीतकमी दिवसांत चांगली ट्रिप होत असल्याने पर्यटक तिथे वारंवार जातात, असेही त्यांनी सांगितले.