दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेचे यंदाचे हीरक महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त गुरुवारपासून ‘लेखिका संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या माटुंगा येथील वा. वा. गोखले सभागृहात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन राज्य निवडणूक आयुक्त आणि कवयित्री-लेखिका नीला सत्यनारायण यांच्या हस्ते गुरुवार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता केले जाणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां व ‘मिळून साऱ्याजणी’ नियतकालिकाच्या संस्थापक विद्या बाळ या लेखिका संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून सन्माननीय अतिथी म्हणून माधवी वैद्य उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक सुरेश खरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिलांचे योगदान साहित्य क्षेत्रात मोठे आहे. परंतु, तसे असूनही अखिल भारतीय साहित्य संमेलने किंवा यांसारख्या मोठय़ा व्यासपीठांवर लेखिका, कवयित्री यांनी योग्य प्रकारे स्थान किंवा महत्त्व दिले जात नाही. असे लक्षात आल्यामुळे दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे छोटय़ा स्तरावर का होईना परंतु, साहित्यातील महिलांच्या योगदानाची दखल घेण्याचे ठरविण्यात आले.
२२ ते २५ नोव्हेंबर असे चार दिवस लेखिका संमेलन होणार असून उद्घाटन सत्रानंतर प्रा. पुष्पा भावे या ‘स्त्रियांची आत्मचरित्रे’ या विषयावर व्याख्यान देतील. त्यानंतर लक्ष्मीबाई टिळक, आनंदी विजापुरे आणि शांता हुबळीकर यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रांमधील निवडक भागांचे अभिवाचन रजनी वेलणकर, अभिनेत्री इला भाटे, अभिनेत्री नीना कुलकर्णी करणार आहेत. दुसऱ्या दिवशी, २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता पत्रकारिता क्षेत्रांतील महिलांचे अनुभव ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, लता राजे, संजीवनी खेर आणि आरती कदम सांगणार आहेत. लोकसाहित्यातील स्त्रीरूपे तसे स्त्री-नाटककारांची नाटके यांसारखे विषयही तज्ज्ञ महिला मांडणार आहेत. चार दिवसांच्या या संमेलनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार, २५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शिका-लेखिका-नाटककार सई परांजपे यांची मुलाखत हे यंदाच्या संमेलनाचे आकर्षण ठरणार असून मधुवंती सप्रे त्यांची प्रकट मुलाखत घेतली. संमेलनाचा समारोप बहिणाबाई यांच्यापासून ते आजपर्यंतच्या कवयित्रींच्या योगदानाचा मागोवा घेणाऱ्या कार्यक्रमात कविता सादरीकरण तसेच गाणी सादर केली जाणार आहेत. यामध्ये अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी हिच्यासह कमलेश भडकमकर, मधुरा कुंभार आदी सहभागी होणार असून उषा मेहता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. संमेलनाच्या प्रवेशिका तसेच अधिक माहितीसाठी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राशी कार्यालयीन वेळेत २४३०४१५० या क्रमांकावर संपर्क साधावा.