मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सींच्या मीटर रिकॅलिब्रेशनला अखेर शुक्रवारी अधिकृत मुदतवाढ देण्यात आली. ई- मीटरच्या रिकॅलिब्रेशनसाठी १५ डिसेंबर, तर मॅकॅनिकल मीटरच्या रिकॅलिब्रेशनसाठी ३१ जानेवारी २०१३ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीनंतर रिकॅलिब्रेट न झालेल्या रिक्षा- टॅक्सींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून विलंबाच्या दिवसागणिक दंड वाढणार असल्याचे परिवहन विभागाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
डॉ. हकीम समितीने केलेल्या शिफारशींनुसार ११ ऑक्टोबरला रिक्षा आणि टॅक्सींची भाडेवाढ करण्यात आल्यावर ४५ दिवसांच्या मुदतीत सर्व रिक्षा- टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेट करण्यास सांगण्यात आले. शहरात एकूण एक लाख ६५ हजार रिक्षा आणि ४२ हजार टॅक्सी असून त्यापैकी १२ हजार टॅक्सी आणि एक लाख तीन हजार रिक्षा मॅकॅनिकल मीटरच्या आहेत. हे सर्व मीटर्स लवकरच इलेक्ट्रॉनिक करण्यासाठीसुद्धा राज्य शासनाने आदेश काढला असल्याने आधी रिकॅलिब्रेशन आणि मग मॅकॅनिकल मीटरचे ई- मीटरमध्ये रुपांतर करण्याऐवजी, तेथे ई-मीटर लावूनच त्याचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी युनियन्सनी परिवहन विभागाकडे केली होती. त्यानुसार परिवहन विभागाने अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.