19 December 2018

News Flash

दुरुस्तीला ‘मसाप’कडे वेळच नाही

साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू नोंदींचा घोळ

साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू नोंदींचा घोळ

साहित्यविश्वातील सर्वात जुनी आणि मातब्बर संस्था अशी ओळख असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ या संस्थेने आपल्या संकेतस्थळावर काही साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू तारखांबाबतचा घातलेला घोळ अद्यापही निस्तरलेला नाही. या तारखांच्या नोंदीत सुधारणा करणे तर दूरच राहिले पण ‘मसाप’च्या संकेतस्थळावरील ‘कार्यक्रम’ या पानावरून ‘त्या’ नोंदीच काढून टाकण्यात आल्या आहेत.

‘मसाप’तर्फे वर्षभरात काही साहित्यिकांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘मसाप’च्या संकेतस्थळावर ‘कार्यक्रम’ या शीर्षकाअंतर्गत देण्यात आलेल्या माहितीत हा घोळ घालण्यात आला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये ऑगस्ट-२०१७ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी ‘मसाप’चे अध्यक्ष प्रा. रावसाहेब कसबे यांनी संकेतस्थळावर साहित्यिकांच्या जन्म-मृत्यूबाबत अनवधानाने ज्या काही चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त केल्या जातील, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले होते. मात्र तीन महिने उलटल्यानंतरही ‘मसाप’ला ही दुरुस्ती करण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही.

जागरूक साहित्यप्रेमी अमेय गुप्ते यांनी हा घोळ ‘मसाप’ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. एवढेच नव्हे तर संबंधित साहित्यिकांच्या जन्म-मृत्यूची नोंदणी असलेले स्थानिक नगरपालिका/महानगरपालिका यांच्याकडून मिळविलेले अधिकृत दाखलेही ‘मसाप’कडे सादर केले आहेत. मात्र, तरीही या गंभीर चुका अद्यापही दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत आणि यावर कडी म्हणून की काय संकेतस्थळावरून चुकीच्या नोंदीचे ते पानच काढून टाकण्यात आले आहे. भाषाप्रभू आणि नाटककार राम गणेश गडकरी यांच्या जयंती (२६ मे) किंवा पुण्यतिथी (२३ जानेवारी)च्या निमित्ताने ‘मसाप’ने कार्यक्रम आयोजित करावा. संकेतस्थळावरील ‘कार्यक्रम’यादीत तशी नोंद केली जावी, अशी मागणीही गुप्ते यांनी ‘मसाप’कडे केली होती. मात्र, त्यावरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

साहित्यिकांच्या जन्म-मृत्यूची चुकीची नोंद

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘स्मृतिदिन’ संकेतस्थळावर १४ एप्रिल असा दाखविण्यात आला होता. खरे तर त्यांचा स्मृतिदिन ६ डिसेंबर असा असून हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून सर्वश्रुत आहे.
  • ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा २ सप्टेंबर या दिवशी मृत्यू झाला. ‘मसाप’ने मात्र ही तारीख ११ जानेवारी अशी दिली होती. ११ जानेवारी हा जयंती दिन आहे.
  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतिदिन या संकेतस्थळावर १७ जुलै असा दाखविण्यात आला होता. तो १८ जुलै असा असायला पाहिजे.
  • ‘मसाप’चे संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. ‘मसाप’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या साहित्यिकांची जयंती आणि पुण्यतिथी तसेच अन्य कार्यक्रमांच्या संख्येतही वाढ झाली आहे. संकेतस्थळ अद्ययावत करताना हे सर्व बदल तसेच जन्म-मृत्यू नोंदणीची झालेली चूक सुधारण्यात येईल. – प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

First Published on November 15, 2017 2:20 am

Web Title: authors wrong birth and death records in maharashtra sahitya parishad website