|| नमिता धुरी

चालक-प्रवाशांमधील विसंवाद सुसंवादात बदलण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न

मुंबई : ‘भैया लेफ्ट लेके मोठेवाले झाड के पास गाडी खडा करो’, ‘शंभर रुपया छुट्टा मिलेगा ना’, असे संवाद रिक्षा-टॅक्सीतल्या प्रवासात सहज ऐकायला मिळतात.  कारण अमराठी चालकांना स्थानिक भाषा येत नसते. अशावेळी एखाद्या प्रवाशाचा ‘मराठी बाणा’ जागा झाल्यास तो अस्खलित मराठीत चालकाला सूचना देऊ लागतो. प्रवासी आणि रिक्षा-टॅक्सी चालक यांच्यातील हा विसंवाद सुसंवादात बदलावा यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीचे धडे देण्याची तयारी केली आहे.

जर्मन विभागाच्या वतीने सुरू असलेला मुख्य ‘माय मराठी’ प्रकल्प सहा पातळ्यांचा आहे. त्यासोबतच ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या सहकार्याने अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचा विशेष लघू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यात युरोपीय भाषा अध्यापन पद्धतीचा वापर केला असल्याने कमी दिवसांत चांगल्याप्रकारे संवाद साधण्यास चालक शिकू शिकतील. यात चालकांना दिशांची मराठीतून ओळख करून दिली जाते. रस्ता विचारणे किंवा सांगणे याचबरोबर शहरातील रुग्णालये, शाळा, सिनेमागृहे, रेल्वेस्थानके, इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती दिली जाते. भाडय़ाची रक्कम प्रवाशाला सांगता यावी यासाठी मराठी अंक ओळख अभ्यासात समाविष्ट करण्यात आली आहे.

शासकीय कागदपत्रे वाचणे, अर्ज भरणे, स्वाक्षरी, निरीक्षक, वारसदार, साक्षीदार, वैधता, तपासणी, इत्यादी व्यवहार मराठीतून कसे करावेत यांविषयी चालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात गेल्यावर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे चालकांसाठी सोयीचे होईल. रिक्षा आणि टॅक्सी कशी बनते याविषयी मराठीतून बोलणे, कुटुंबाविषयी बोलणे, सूचना देणे व पाळणे, दिनक्रम सांगणे, वर्णनात्मक शब्द अशा गोष्टींतून चालकांना अधिकाधिक बोलते करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. तसेच स्वर, व्यंजने, जोडाक्षरे, सर्वनामे, क्रियापदे, स्थलवाचक क्रियाविशेषणे, काळ याद्वारे व्याकरणही पक्के करून घेतले जाईल. ध्वनिमुद्रित आणि दृकश्राव्य फितींचाही आधार अध्यापन करताना घेतला जाणार आहे.

अभ्यासक्रमाची पुस्तके तयार

एकूण चार लघू अभ्यासक्रम तयार करण्याचे नियोजित आहे. त्यापैकी रिक्षा-टॅक्सी चालक आणि परिचारिकांसाठीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके तयार आहेत. अमराठी परिचारिकांना रुग्णांची विचारपूस करता यावी, विविध आजारांची आणि रुग्णालयातील विविध विभागांची मराठी नावे माहीत व्हावीत यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. तसेच शासकीय व बँक कर्मचाऱ्यांसाठीच्या अभ्यासक्रमाचे लेखन सध्या सुरू आहे.