संचारबंदीमुळे प्रवाशांची कमतरता; कमाईअभावी उदरनिर्वाहाचा प्रश्न

मुंबई : करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून रिक्षावाहतुकीला वगळण्यात आले असले तरी, प्रवासीच नसल्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत. दिवसभर वणवण करूनही जेमतेम शंभर रुपये कमाईही होत नसल्याने रिक्षाचे हप्ते कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर पडला आहे.

राज्य सरकारने १४ एप्रिलपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू केली आहे. मात्र यातून रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक सेवांना वगळण्यात आले होते. ही सार्वजनिक वाहतूक साधने सुरू राहिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच रिक्षाचालकांनाही आधार मिळाला होता. मात्र संचारबंदीमुळे बाजारपेठा, खासगी कार्यालये बंद असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. तसेच बहुतांश नागरिक खासगी वाहनांनी किंवा अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवेतून प्रवास करत आहेत. परिणामी रिक्षाच्या प्रवासीसंख्येत कमालीची घट झाली आहे.

संचारबंदी लागू होण्यापूर्वी रोज भाडय़ातून आठशे ते हजार रुपये मिळत होते. रिक्षाचा गॅस, गाडीचा हप्ता बाजूला काढल्यानंतर पाचशे ते सहाशे रुपये रिक्षाचालकांच्या पदरात पडत होते. मात्र सध्या मागच्या वर्षांसारखीच परिस्थिती ओढवल्याने हप्ते कसे भरायचे आणि कुटुंबीयांना कसे पोसायचे, हा प्रश्न रिक्षाचालकांसमोर आहे. मुंबईत रिक्षा चालवणारा मोठा वर्ग हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहे. मात्र संचारबंदीची घोषणा होताच अनेकांनी आपले गाव गाठले आहे. ‘माझ्या कुटुंबात पाच सदस्य आहे. रिक्षावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र टाळेबंदी लागू झाल्यापासून दिवसभरात केवळ ६० ते १०० रुपये भाडे मिळत आहे. त्यामुळे रिक्षा हप्ता कसा भरायचा आणि घरी मुलांना काय खायला द्यायचे, हा प्रश्न भेडसावत आहे,’ अशी प्रतिक्रिया शशिकांत घोलप या रिक्षाचालकाने दिली.