मुंबईतील रिक्षाचालक-मालक यांच्या विविध मागण्यांसाठी ‘मुंबई ऑटोरिक्षामेन्स’ या संघटनेने आज, सोमवारी आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मुंबईतील तब्बल ८३ हजार रिक्षा रस्त्यावर उतरणार नाहीत. त्यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
खासगी रिक्षा-टॅक्सी समन्वयक कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी त्यांच्यासाठी नियमावली तयार करावी, ही प्रमुख मागणी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने केली होती. मात्र, परिवहन विभाग आणि परिवहनमंत्री यांनी आश्वासने देऊनही याबाबत कोणतेही ठोस उपाय योजलेले नाहीत. त्यामुळे संघटनेने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनात मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे ८३ हजार रिक्षा चालक-मालक सोमवारी आपापल्या विभागांतील परिवहन कार्यालयांवर मोर्चा नेणार आहेत. मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालये, तसेच परिवहन आयुक्तांचे कार्यालय, परिवहनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडेही निवेदन देण्यात येणार आहे.
या आंदोलनामुळे उपनगरांतील मुंबईकरांचा प्रवास काहीसा कठीण होणार आहे. तसेच नेहमीपेक्षा बसगाडय़ांनाही जादा गर्दी असण्याची शक्यता आहे. गर्दीच्या मार्गावर जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हे लाक्षणिक आंदोलन आहे. अनेकदा मागण्या करूनही प्रशासनाने आमच्या मागण्यांचा गंभीर विचार केलेला नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय इतर कोणताही पर्याय हाती नाही.
शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन