मुंबईतील चाकरमान्यांची रिक्षा चालवत सेवा करणाऱ्या चालकाच्या मुलीने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. प्रेमा जयकुमार असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून, विपरीत परिस्थितीशी झुंजून तिने हे अद्वितीय यश मिळवले आहे.
मुंबईमधील पश्चिम उपनगरात मालाड येथे चाळीत प्रेमा आपल्या कुटुंबीयांसह राहाते. नोव्हेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात आपल्याला मिळालेल्या यशाने आपण सुखावलो असल्याची प्रतिक्रिया प्रेमा हिने व्यक्त केली.
या यशासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळेच ही माझ्या आयुष्यातील अद्वितीय बाब असल्याचे प्रेमा म्हणाली.
जयकुमार कुटुंबीय मूळचे तामिळनाडूचे असून उपजीविकेच्या कारणास्तव गेली काही वर्षे त्यांचे मुंबईतच वास्तव्य आहे. प्रेमाचे वडील जयकुमार पेरुमल हे रिक्षाचालक आहेत. आपल्याला मिळालेल्या या यशामुळे आता आई-वडिलांचे कष्ट कमी होतील आणि आमच्या कुटुंबाला अधिक समाधानाने आयुष्य कंठता येईल, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया प्रेमा हिने एका प्रश्नाचे उत्तर देताना व्यक्त केली.
८०० पैकी ६०७ गुण मिळवणाऱ्या प्रेमाने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांना दिले. पालकांचा सातत्याने मिळणारा पाठिंबा, त्यांचे प्रेरक शब्द यांच्याशिवाय हे यश मिळूच शकले नसते, असे तिने सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या बी.कॉम.च्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या प्रेमा हिच्या सख्ख्या भावानेही आपल्या बहिणीसह सीएच्या परीक्षेत धवल यश मिळवले आहे.