रिक्षाचालक-मालक यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त करण्यासाठी मंगळवारी रिक्षाचालकांनी अंधेरी आणि वडाळा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असल्याने रिक्षा संघटनांनी संपाचे हत्यार उगारले नसले, तरी परीक्षांनंतर मुख्यमंत्र्यांविरोधात व्यापक आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती कृती समितीतर्फे देण्यात आली. या आंदोलनात मुंबईतील नऊ हजार रिक्षा चालक-मालक सहभागी झाल्याचेही संघटनेने सांगितले.
रिक्षाच्या परवान्यासाठी ऑनलाइन प्रणालीतील घोळ दूर करावा, परवान्यासाठी असलेली १०वी पासची अट रद्द करावी अशा मागण्यांसाठी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिक्षाचालकांविरोधातील निर्णयांचा सपाटा लावल्याच्या विरोधात मुंबई ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. मात्र १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असल्याने या आंदोलनाचे स्वरूप गंभीर नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले. मंगळवारी अंधेरी आणि वडाळा या प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर अनुक्रमे सहा आणि तीन हजार रिक्षाचालकांनी धरणे आंदोलन केले.  मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय न घेतल्यास  १५ लाख रिक्षाचालक राज्यभरात उग्र आंदोलनाचे हत्यार उपसतील, असा इशारा रिक्षाचालकांनी  दिला.