उच्च न्यायालयाने रिक्षा-टॅक्सी यांच्या किमान भाडय़ात एका रुपयाने वाढ करण्याच्या हकीम समितीच्या शिफारशीला मान्यता दिल्यानंतरही रिक्षा-टॅक्सीचालक- मालक यांनी पुन्हा एकदा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेवाढीचा निर्णय झाल्यानंतर तो अमलात येण्यासाठी आवश्यक असलेल्या मीटर रिकॅलिबरेशन प्रक्रियेसाठी ६०० रुपये खर्च आकारण्याचा निर्णय वैधमापन शास्त्र विभागाने घेतला होता. मात्र या प्रक्रियेसाठी ४०० रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाऊ नये आणि या प्रक्रियेचा अनुभव नसलेल्या संस्थांकडे या प्रक्रियेचे हक्क दिले जाऊ नयेत, या मागण्या मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने मंगळवारी केल्या. पुढील ४८ तासांत याबाबत निर्णय न झाल्यास रिक्षा-टॅक्सीचालक- मालक पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.