निवडक सतरा कादंबऱ्या, लेख व आठवणींचा समावेश
‘धनंजय’, ‘काळापहाड’, ‘झुंझार, छोटू’अशा व्यक्तिरेखांनी मराठी वाचकांवर गारुड करणारे आणि काल्पनिक ‘मानसपुत्रां’ना जिवंत करणारे दिवंगत साहित्यिक बाबूराव अर्नाळकर यांचा ‘झुंजार’काळ लवकरच वाचकांच्या भेटीस येणार आहे. ‘राजहंस प्रकाशन’ संस्थेच्या ‘निवडक बाबूराव’ या स्मृतिग्रंथात त्यांच्या निवडक सतरा कादंबऱ्यांसह, पत्रव्यवहार व आठवणींचे संकलन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नाटकककार महेश एलकुंचवार यांची प्रस्तावना असलेल्या स्मृतिग्रंथाची संकल्पना चित्रकार सतीश भावसार यांची आहे.
ग्रंथात मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू, विश्वास पाटील यांचे लेख आहेत. ‘रहस्यकथा’ हा स्वतंत्र साहित्यप्रकार अर्नाळकर यांनी मराठीत रूढ केला. युरोप-इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेल्या रहस्यकथेला अर्नाळकरांनी मराठी चेहरा दिला. गिरगावात चष्म्याचे दुकान चालवत असताना ते इंग्रजी रहस्यकथांची पारायणे करत. वयाच्या सदतिसाव्या वर्षी ‘चौकटची राणी’ ही रहस्यमय कादंबरी त्यांनी दोन दिवसांत लिहून काढली. आपल्या साहित्यातून अर्नाळकरांनी रंगवलेल्या ‘झुंझार’, ‘धनंजय’ या व्यक्तिरेखा अमाप लोकप्रिय झाल्या. ही दोन्ही माणसे खरोखरच अस्तित्वात आहेत, असे लोकांना वाटत होते. त्यांना आमच्या मदतीसाठी पाठवा, असे लोक त्यांना सांगत किंवा पत्र पाठवून विचारणा करत.
अर्नाळकरांच्या कादंबऱ्या पहिल्यांदा छापण्याचा मान दिवंगत अभिनेते बबन प्रभू यांच्या वडिलांकडे जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर, पु.ल देशपांडे, नटश्रेष्ठ बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, बाबूराव पेंढारकर, विठ्ठलराव गाडगीळ, मंगेशकर कुटुंबीय असे मान्यवर अर्नाळकरांच्या साहित्याचे चाहते होते.
‘रहस्यकथा’ हा साहित्यप्रकार अर्नाळकर यांनी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांत पोचविला आणि लोकप्रिय केला. ‘रहस्यकथा’साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळवून दिले. अर्नाळकरांच्या या कामाची कृतज्ञता पूर्वक नोंद घेण्यासाठी हा स्मृतिग्रंथ प्रकाशित करत आहोत.
– दिलीप माजगावकर,  संचालक, राजहंस प्रकाशन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autobiography of literary baburao arnalkar
First published on: 03-01-2016 at 03:16 IST