अपघात टाळण्यासाठी सतर्क करणारी यंत्रणा लवकरच

मुंबई : वाहन चालवताना चालकाला अचानक ‘डुलकी’ येते. अशा वेळी अपघाताचा धोका संभवतो. तो टाळण्यासाठी चालकाला त्वरित सतर्क करणारी यंत्रणा राज्य परिवहन विभाग विकसित करीत आहे.

दूरचा प्रवास करताना तासन्तास वाहन चालवून थकल्यानंतर काही चालकांना झोप येते. तशा अवस्थेतही अनेक चालक विश्रांती न घेता लवकर पोहोचण्यासाठी वाहन चालवतात. अशा वेळी त्यांना ‘डुलकी’ येऊ शकते. त्यामुळे ‘डुलकी’ येताच त्यांना सतर्क करणारी यंत्रणा राज्य परिवहन विभाग विकसित करीत आहे. एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीबरोबर या प्रकल्पावर काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. मद्यपान करून वाहन चालविणे, पुढच्या वाहनाला मागे टाकण्याची घाई, वेगाने वाहन चालविणे याबरोबरच वाहनचालकाची ‘डुलकी’सुद्धा अपघातास कारणीभूत ठरते. अशी ‘डुलकी’ येताच ही यंत्रणा वाहनचालकाला धोक्याचा इशारा देण्याचे काम करील.

वाढते अपघात..

राज्यात २०१९ मध्ये ३२ हजार ९२५ अपघात झाले. त्यांत १२ हजार ७८८ जणांचा मृत्यू झाला, तर २८ हजार ६२८ जखमी झाले. २०२० मध्येही २४ हजार ९७१ अपघातांमध्ये ११ हजार ५६९ जणांचा मृत्यू झाला आणि १९ हजार ९१४ जखमी झाले.

डोळे पेंगुळताच.. 

चारचाकी वाहनांपासून ते अवजड वाहनांपर्यंतच्या चालकांना इशारा देणारी स्वतंत्र यंत्रणा असेल. वाहनमालकांना ती खरेदी करावी लागेल. या यंत्रणेत कॅमेरा आणि संवेदक (सेंसर) असेल. चालकाच्या आसनासमोरच ती बसवावी लागेल. चालकाच्या डोळ्यांची हालचाल त्यातून टिपली जाईल आणि संवेदक त्वरित धोक्याचा इशारा देईल.

तासन्तास वाहन चालवल्यानंतर झोपेची गरज असते. तरीही अनेक चालक झोपेकडे दुर्लक्ष करून वाहन चालवतात. अशा वेळी अपघात टाळण्यासाठी सतर्क करणाऱ्या यंत्रणेवर काम के ले जात आहे.

अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त