अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम रेल्वेवर प्रायोगिक तत्त्वावरील स्वयंचलित दरवाज्यांची पहिली ‘धाव’ रविवारपुरती तरी यशस्वी ठरली आहे. महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातील दोन दरवाजे स्वयंचलित असलेली ही लोकल रविवारी चर्चगेट ते बोरिवली यादरम्यान धावली आणि डब्यातील मोजक्याच महिलांनी सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेतला. आता सोमवारी गर्दीच्या दिवशी या स्वयंचलित दरवाजांच्या लोकलचा कस लागणार आहे.
लोकलमधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी  रेल्वेने शुक्रवारी स्वयंचलित दरवाजे असलेल्या गाडीची चाचणी घेतली. ही गाडी रविवारपासून पश्चिम रेल्वेच्या सेवेत आली आहे. गाडी बोरिवली स्थानकात पोहोचल्यानंतर अनेकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. पावसाळ्यात दरवाजांचा उपयोग होईल,असे प्रवासी सुधिता चोडणकर यांनी सांगितले.
रविवारी हे स्वयंचलित दरवाजे अडीच ते तीन सेकंदांत उघडबंद होत होते. ही यंत्रणा योग्यरीत्या कार्यान्वित राहण्यासाठी पश्चिम रेल्वेने या डब्यांमागील डब्यांत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या बंद दरवाजांमुळे महिलांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.