शैलजा तिवले

एखादी गोष्ट करण्याची जिद्द असली की शिक्षणाची आडकाठी सहज दूर सारता येते, हे उत्तर प्रदेशच्या बुंदेल जिल्ह्य़ाच्या छोटय़ाशा गावातील अनिश कर्मा यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. स्वत: अपंग असलेल्या अनिश यांनी कला शाखेतून बारावी उत्तीर्ण केली असून  अपंग व्यक्तींचा आधार असलेल्या ड्रॉप लॉक कॅलिपरमध्ये (पायांना आधार देण्यासाठी असलेल्या धातूच्या पट्टय़ा) तांत्रिक बदल करून स्वयंचलित कॅलिपर घडविला आहे.

भारतातील हा पहिलाच स्वयंचलित यांत्रिक कॅलिपर असून या संकल्पनेचे ‘स्वामित्व हक्क’ मिळविण्यासाठीही अनिश यांची धडपड सुरू आहे. आयआयटीच्या ‘बायोमेडिकल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ (बेटिक) संस्थेने  त्यांना सहभागी करून पुढील काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

बारावी पूर्ण झाल्यानंतर अनिश बुंदेलमधील एका छोटय़ाशा रुग्णालयात वॉर्ड बॉयची नोकरी करत होते. त्यांची पत्नीही अपंग असून तिला चालण्यासाठी कॅलिपरचा वापर करावा लागतो. हे कॅलिपर गैरसोयीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी उत्सुकतेपोटी कॅलिपर वापरणाऱ्या अनेक व्यक्तींशी संवाद साधणे सुरू केले.

सध्या वापरात असलेले कॅलिपर घातल्यानंतर व्यक्तीचा पाय ताठच राहतो. त्यामुळे त्याला चालताना खूप वजन उचलून एका पायावर भार देत चालावे लागते. तसेच हे कॅलिपर ९० अंशांपर्यंतच दुमडत असल्याने व्यक्तीला खाली बसणे किंवा भारतीय पद्धतीच्या शौचालयांमध्ये बसणे अवघड होई. त्यामुळे त्यांनी मूळ कॅलिपरच्या आराखडय़ामध्ये तांत्रिक बदल करण्याची कल्पना सुचली.

भंगारच्या दुकानांतून सामान   मिळवून त्यांनी नवीन कॅलिपर साकार केला. त्यांनी सांगितले की, ‘मी  लोहार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच लोखंडाच्या विविध वस्तूंशी खेळणे हाच माझा छंद आहे.  एखादी कल्पना सुचली की ती कशी उभी करायची याचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आणि तसे माझे हात चालायला लागतात.’

कॅलिपर साकारला पण हे संशोधन मांडायचे कुठे, हे अनिश यांना माहीत नव्हते. एका संशोधकाला दिल्ली येथील ‘नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ने मदत केल्याचे वर्तमानपत्रात वाचून मीही तेथे मदतीसाठी पोहोचलो. अनेकदा हेलपाटे घातल्यानंतर त्यांनी माझे काम मान्य केले. अनेक ठिकाणी आर्थिक मदतीसाठी झगडत असताना आयआयटीच्या ‘बेटिक’ संस्थेशी संपर्क आला. माझे संशोधन  पटल्यानंतर त्यांनी ‘बेटिक’अंतर्गतच हा प्रकल्प सुरू करून मला काम करण्याची संधी दिली, असे अनिश यांनी सांगितले.

या कॅलिपरची सध्या औद्योगिक चाचणी सुरू असून त्यानंतर प्रत्यक्ष व्यक्तींवर तपासणी केली जाईल. त्यानंतर हे उत्पादन बाजारात आणले जाईल.

भारतीय बाजारपेठेत स्वयंचलित कॅलिपर असून ते विद्युत यंत्रणेवर चालणारे आहेत. त्याची किंमत पाच लाखांपर्यंत असून बॅटरीची मर्यादा आहे. परदेशात असे कॅलिपर उपलब्ध असले तरी त्यांच्या किमती सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत.

भारतातील सामान्य माणसाला परवडेल अशा किमतींमध्ये यांत्रिक स्वयंचलित कॅलिपर तयार केल्याचे समाधान आहे. यामुळे केवळ पायाच्या कमजोरीमुळे अकार्यक्षम असलेल्या व्यक्तींची कार्यक्षमता वाढून त्यांच्या दैनंदिन जीवनात ते काम करू शकतील, असे अनिश आत्मविश्वासाने सांगतात.

पदवी नाही तरीही..

‘बायटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रॅण्ट’ मिळविण्यासाठी व या उत्पादनाच्या निर्मितीसाठी कंपनी सुरू करण्यासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. मी पदवीधर नसल्याने गेल्या वर्षी यासाठी अर्ज करू शकलो नाही. माझी पत्नी पदव्युत्तर आहे. आता तिच्या नावाने मी अर्ज करत आहे.

अनुदानाच्या प्रतीक्षेत..

अनिश यांच्या कामाची दखल घेऊन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने ४ ऑगस्ट २०१५ रोजी ५ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. तीन वर्षे पूर्ण झाली तरी मात्र अजून अनुदानाची रक्कम हाती पडली नसल्याची खंत अनिश व्यक्त करतात.

कसा आहे स्वयंचलित यांत्रिक कॅलिपर?

कॅलिपरच्या दुमडणाऱ्या भागामध्ये गोल चकतीचे तंत्रज्ञान वापरून अनिश यांनी तो पूर्णपणे दुमडला जाईल, असे तांत्रिक बदल केले आहेत. याचे वैशिष्टय़ म्हणजे पाय जमिनीवर टेकवल्यावर पडलेल्या दबावामुळे कॅलिपर लॉक होतो आणि पाय ताठ होतो. पाय उचलल्यानंतर दबाव कमी झाल्यावर हे लॉक खुलते आणि पाय पुढे टाकणे सोईचे जाते. या कॅलिपरच्या साहाय्याने व्यक्तीला पटपट चालणे तर शक्य आहेच तसेच बसण्यासाठी लॉक उघडणे आणि उभे राहण्यासाठी लॉक बंद करण्याचा त्रास कमी झाला आहे. कॅलिपरचा सांगाडा पूर्णपणे दुमडणे शक्य असल्याने व्यक्तीला भारतीय पद्धतीच्या शौचालयामध्ये बसणेही सहज आहे. कॅलिपरने पायांमध्ये सुसूत्रता आणणेही सोपे झाले असून याचा वापर करून अगदी सायकलही चालविणे शक्य असल्याचे अनिश यांनी स्वत: सायकल चालवून दाखवून दिले आहे.