पालिका रुग्णालयांमध्ये निष्णात डॉक्टरांची फौज उभी करण्याच्या उद्देशाने स्वत:चे स्वायत्त वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. स्वायत्त वैद्यकीय विद्यापीठामुळे जनता आणि पालिकेला होणारे फायदे आणि तोटे लक्षात घेऊन त्याची स्थापना करण्याचा विचार सुरू झाला आहे. शिवसेनेकडून त्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.
सध्या महापालिकेचे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, सेठ गोवर्धनदास सुंदरदास महाविद्यालय, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय कार्यरत आहेत. पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी येथे कूपर रुग्णालयात, तसेच पूर्व उपनगरात गोवंडी येथील शताब्दी सर्वसाधारण रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे पालिकेचेच स्वायत्त वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना मनीषा म्हैसकर यांनी मांडला होता. पालिका रुग्णालयांमध्ये दरवर्षी डॉक्टरांची फौज उभी करून आरोग्य सेवा बळकट करण्याचा त्या मागचा हेतू होता. मात्र काही दिवसांनी मनीषा म्हैसकर यांची बदली झाली आणि वैद्यकीय विद्यापीठ स्थापनेचा मुद्दा मागे पडला.
पालिका रुग्णालयामध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र निष्णात डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. पालिका रुग्णालयात निष्णात डॉक्टरांनी यावे यासाठी त्यांना ७५ हजार रुपयांहून अधिक वेतन देण्याची तयारी पालिकेने दर्शविली होती, मात्र तरीही निष्णात डॉक्टरांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेकडून स्वायत्त वैद्यकीय विद्यापीठ स्थापनेचा विचार सुरू झाला. स्वायत्त विद्यापीठ स्थापन केल्यानंतर जनता आणि पालिकेला कोणते फायदे होऊ शकतील याची माहिती प्रशासनाकडून सादर करण्यात येणार होती. परंतु मनीषा म्हैसकर यांची बदली झाल्यानंतर आजतागायत ती माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ महत्त्वपूर्ण ठरणार असेल तर ते स्थापन करण्यास हरकत नाही. त्यासाठी प्रशासनाने विद्यापीठ स्थापनेबाबतची माहिती सादर करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, पूर्व उपनगरातील रहिवाशांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गोवंडी शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास शासनाकडून परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.