अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सुरु झालेल्या वादावरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. अगदी महाराष्ट्रातील विधानसभेच्या अधिवेशनामध्येही या विषयावर चांगलीच चर्चा रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. असं असतानाच आता भाजपाचे प्रसारमाध्यम संयोजक असणाऱ्या अवधूत वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या एका स्पष्टीकरणावरुन त्यांच्यावर निशाणा साधताना, त्यांनी शिक्षण शाळेतल्या चपराशाकडून घेतल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणासंदर्भात भाष्य करताना मुंबईमधील चित्रपट निर्मिती क्षेत्रासंदर्भात चिंताही वाघ यांनी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना राऊत यांनी सोमवारी केलं. कंगनाबद्दल वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला असल्याचे सांगताना राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिलं.  याचवरुन वाघ यांनी, “चूक संजय राऊत यांची नाही. जशी ते औषधे डॉक्टरकडून न घेता कंपाऊंडरकडून घेतात तसेच त्यांनी शिक्षण पण शिक्षकांकडून न घेता शाळेतल्या चपराश्याकडून घेतलं आहे,” असा टोला लगावला आहे.

…तर बॉलिवूड गाशा गुंडाळेल

वाघ यांनी ट्विटरवरुन कंगना विरुद्ध महाराष्ट्रातील राजकीय पक्ष या वादावर भाष्य करताना, “हे असंच चालु राहील तर बॉलिवूड मुंबईमधून गाशा गुंडाळेल ही शक्यता नाकारता येत नाही,” अशी भीतीही व्यक्त केली आहे.

ती कारवाई सूडबुद्धीने

इतकच नाही तर, मुंबई महापालिकेने कंगनाच्या मुंबई मधील कार्यालयावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचा संशय येतो असंही वाघ अन्य एका ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कंगनाने केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच केंद्र सरकारने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने आपण ९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये येत असल्याचं म्हटलं आहे.