भक्ती परब

दूरचित्रवाणीवर मालिका प्रसारित होण्याआधीच विविध अ‍ॅपवर त्या उपलब्ध झाल्याने दूरचित्रवाणीच्या ग्राहकांचा हिरमोड होत आहे. ऑनलाइन आशय पाहणारे प्रेक्षक दूरचित्रवाणीवरील प्रसारणाआधी मालिका पाहून त्या मालिकेविषयी समाजमाध्यमांवर चर्चा करण्यास सुरू करतात. येत्या भागाचा आशयच अशा पद्धतीने ‘फुटत’ असल्याने दूरचित्रवाणी प्रेक्षकांचा रसभंग होतो आहे.

हॉटस्टार, झी ५, सोनी लाइव्ह आणि वूट या अ‍ॅपवर दूरचित्रवाणीचा प्रेक्षक दूरचित्रवाणीवर त्या त्या वेळेत पाहता न आलेले कार्यक्रम आणि मालिका पाहतो. या अ‍ॅपवर दूरचित्रवाणीवरील मालिका आणि काही स्वतंत्र वेबसीरिज, खेळाच्या वाहिन्या, बातम्या आणि लाइव्ह टीव्हीचाही पर्याय देण्यात आला आहे. हॉटस्टार आणि झी ५ या अ‍ॅपच्या प्रीमियम आणि व्हीआयपी सबस्क्रिप्शन (सभासदत्व) घेतलेल्या ग्राहकांना मालिका दूरचित्रवाणीवर मालिका प्रसारित होण्याआधीच पाहायला मिळते. त्यामुळे हे ऑनलाइन प्रेक्षक त्या भागात काय झाले, याची चर्चा समाजमाध्यमांवर करतात. तसेच काही नेटकरी खोटय़ा अकाऊंटवरून मालिकेच्या एक ते दोन मिनिटांच्या छोटय़ा छोटय़ा क्लिपच्या स्वरूपात ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर पोस्ट करतात. त्यामुळे सायंकाळी प्राइम टाइमला दूरचित्रवाणीवर मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांचा विरस होतो.

स्टार आणि झी समूहाच्या वाहिन्यांवरील मालिका इतर वाहिन्यांच्या तुलनेत लोकप्रिय आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी झी ५ वर मालिकांचे भाग दूरचित्रवाणीवरील प्रसारणाआधी अपलोड होतात. ‘आयपीएलचे सामने’, ‘गेम ऑफ थ्रोनचे आठवे पर्व’, त्यानंतर स्टार समूहाकडे या वर्षी विश्वचषक प्रसारणाचे हक्क आले. त्यामुळे प्रेक्षकांना हॉटस्टार अ‍ॅपकडे आकर्षित करण्यासाठी खेळाच्या वाहिन्या आणि दूरचित्रवाणीवर प्रसारणाच्या आधी मालिका पाहण्याची सुविधा असे पॅकेज ग्राहकांना देऊन हॉटस्टारने प्रीमियम सेवा  योजना मार्च महिन्यापासून जाहीर केली. परंतु गेल्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष सभासदत्व घेतलेले ग्राहक वाढू लागले तेव्हा ही बाब उघडकीस आली. याविषयी समाजमाध्यमांचाच आधार घेत आपली नाराजी व्यक्त करण्यापलीकडे सुज्ञ प्रेक्षकांकडे पर्याय उरलेला नाही.