पहिल्याच दिवशी देशभरातून ४० कोटी रुपयांची कमाई

हॉलीवुडपटांना आपल्याकडे तुफान प्रतिसाद मिळतो हे वारंवार सिध्द झाले आहे. त्यातही सुपरहिरोपट आणि ‘माव्‍‌र्हल’च्या चित्रपटांना देशभरातून तिकीटबारीवर विक्रमी प्रतिसाद मिळालेला असल्याने शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’लाही विक्रमी प्रतिसाद मिळणार हा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज खरा ठरला आहे. माव्‍‌र्हलच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने देशभरातून पहिल्याच दिवशी ४० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉलीवुडच्या ‘दंगल’, ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

थॅनॉससारखा खलनायक आणि ‘माव्‍‌र्हल’चे आजी-माजी सुपरहिरो एकत्र आणत तयार झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाचा पहिला भाग शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला आहे. आजवर कुठल्याही हॉलीवुडपटाने भारतात एवढी कमाई पहिल्याच दिवशी केली नव्हती जेवढी या चित्रपटाने केली आहे. ‘डिस्ने इंडिया’ने प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार या चित्रपटाने देशभरात ४०.१३ कोटी रुपयांची कमाई केली असून यावर्षीचा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ने पहिल्या दिवशी २५ कोटी रु पयांची कमाई केली होती त्यामुळे तो यावर्षीचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता. आता त्याला ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाने मागे टाकले आहे. याआधी एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या माव्‍‌र्हलच्याच ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने एकूण ७० कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र पहिल्याच दिवशी ४० कोटींचा आकडा मागे टाकणारा हा चित्रपट तीन दिवसांत विक्रमी कमाई करणार असल्याने सगळ्यांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. देशभरात केवळ २००० चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होऊनही चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. त्या तुलनेत ‘बागी २’ ३५०० चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला होता. जगभरातूनही या चित्रपटाने १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली असून या आठवडय़ाच्या अखेपर्यंत हा चित्रपट ५०० दशलक्ष डॉलर्सचा पल्ला गाठेल, असा ट्रेड विश्लेषकांचा होरा आहे.

चित्रपटगृहांसाठी ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा मोठाच दिलासा ठरला आहे. यावर्षीही हिंदीतील बिग बजेट चित्रपट तिकीटबारीवरच्या कमाईत मागे पडले आहेत. त्यातल्या त्यात ‘बागी २’ने शंभर कोटींचा पल्ला पार करत थोडी आशा निर्माण केली होती. मात्र एप्रिल-मे महिन्यातील सुटीचे गणित पकडता ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’वर चित्रपटगृहांची मदार होती. गेल्यावर्षीपर्यंत हॉलीवुडपटांच्या भरातातील कमाईचा आकडा हा वाढता राहिला आहे. गेल्यावर्षी हॉलीवुडपटांनी देशात एकूण ८०१ कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतीय चित्रपट व्यवसाच्या एकूण उत्पन्नापैकी हे प्रमाण १३ टक्के एवढे आहे. यावर्षी मात्र हॉलीवुडपटांच्या देशातील कमाईचा टक्का मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत. त्याची प्रचिती ‘ब्लॅक पँथर’ आणि आता प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ला मिळालेल्या प्रतिसादातून येते आहे.