गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून मुंबईमधील रुग्ण दुपटीचा काळ सरासरी २५५ दिवसांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या २४ पैकी २१ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २०० दिवसांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी चार विभागांमध्ये हा काळ ४००, तर पाच विभागांमध्ये ३०० दिवसांहून अधिक आहे.

गणेशोत्सवानंतर मुंबईत पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली होती. मात्र त्यानंतर पालिकेने रुग्णांचा युद्धपातळीवर शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच संसर्ग पसरू नये यासाठी मुखपट्टीचा वापर बंधनकारक केला. तसेच मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.

पालिकेच्या प्रशासकीय विभागांमधील करोना संसर्गावर हळूहळू नियंत्रण येताना दिसू लागले आहे. परिणामी, मुंबईतील रुग्ण दुपटीचा काळ सरासरी २५५ दिवसांवर पोहोचला आहे. हा काळ पालिकेच्या चार विभागांमध्ये ४०० दिवसांवर, पाच विभागांमध्ये ३०० दिवसांवर, तर १२ विभागांमध्ये २०० दिवसांपेक्षा अधिक आहे. ५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीने २०० दिवसांचा  (२०८) टप्पा ओलांडला होता. इतकेच नव्हे तर रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन ०.२७ टक्के झाला आहे. यातही २४ पैकी १४ विभागांमध्ये रुग्णवाढीचा सरासरी दर ०.२७ टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. ५ नोव्हेंबर रोजी रुग्णवाढीचा सरासरी दर ०.३३ टक्के होता.

महत्त्वाचे टप्पे

१०० दिवस   २० ऑक्टोबर

१२६ दिवस    २४ ऑक्टोबर

१५० दिवस    २९ ऑक्टोबर

२०८ दिवस    ०५ नोव्हेंबर

२५५ दिवस    १४ नोव्हेंबर