अनेक विद्यार्थ्यांना बारावी प्रवेश देण्यास नकार

मुंबई : परीक्षा रद्द करून सरासरी गुण देण्याच्या निर्णयाचा फटका यंदा अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर लगेच परीक्षांना तोंड देण्याची वेळ, अकरावीचे वर्ष गांभिर्याने न घेणे या गोष्टींमुळे आता विद्यार्थ्यांचे निकाल घसरले आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्याही वार्षिक परीक्षा रद्द करून वर्षभरातील चाचण्या, सहामाही, प्रकल्प यांतील गुणांच्या सरासरीनुसार वार्षिक परीक्षेचे गुण देण्यात आले. मात्र, याचा फटका यंदा अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले असून बारावीच्या वर्गात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. दहावीला चांगले गुण मिळवून नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांचे सूत्र फळास आलेले नाही. एका प्रतिष्ठित वाणिज्य महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांना बारावीला प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

उशिरा प्रवेश आणि दुर्लक्ष

अकरावीचे प्रवेश दरवर्षी लांबतात. गेल्यावर्षी आरक्षणाच्या गोंधळात प्रवेश प्रक्रिया अधिकच रखडली. विद्यार्थी प्रवेश घेतात तोच त्यांना परीक्षांना तोंड देण्याची वेळ येते. शाळेतून महाविद्यालयाच्या वातावरणात गेल्यानंतर त्याच्याशी जुळवून घेण्यास विद्यार्थ्यांना वेळ लागतो. विज्ञान आणि कला शाखेतील अनेक विषय दहावीपर्यंत शिकलेले असले तरी अकरावीला त्याची काठिण्य पातळी वाढते. वाणिज्य शाखेचे सर्व विषय विद्यार्थ्यांसाठी नवे असतात. त्यामुळे वर्षभरातील परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. ‘विद्यार्थी अकरावीच्या वर्षांकडे गांभिर्याने पाहात नाहीत. वर्गामध्येही उपस्थिती कमी असते. अनेकांचा भर वार्षिक परीक्षेवरच असतो.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर सरासरी गुण देण्याचा परिणाम होऊ शकतो,’ असे मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यानी सांगितले.

फेरपरीक्षेच्या संधीबाबतही संदिग्धता

नियमानुसार वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर फेरपरीक्षेची संधी देण्यात येते. यंदा मात्र अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार का याबाबत साशंकता आहे. शैक्षणिक वर्षांत महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत संभ्रम आहे. फेरपरीक्षेची संधी मिळावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन

‘एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर अवघ्या वीस दिवसांत त्यांना परीक्षेला बसावे लागले. त्यानंतर चाळीस दिवसांनी पहिली सत्र परीक्षा झाली. त्यामुळे अकरावीत मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी देण्यात यावी,’ असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती संघटनेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.