मुंबई : हिंदू कट्टरपंथीयांनी बेळगावच्या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवला तेव्हा मुंबईच्या घाटकोपर येथून अटक करण्यात आलेला आरोपी अविनाश पवारचा वावर त्याच परिसरात होत. याशिवाय पुण्याच्या सनबर्न या पाश्चिमात्य संगीत महोत्सवात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखण्यासाठी आयोजित बैठकीतही पवार उपस्थित होता, अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मिळाली आहे.

एटीएसने मंगळवारी पवारला मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करून त्याची कोठडी वाढवण्याची विनंती केली. सुनावणीदरम्यान तपासातून पुढे आलेल्या वरील मुद्दय़ांसह पवार याचा अटकेत असलेल्या अन्य आरोपींशी असलेला संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एटीएसने केला. पवार याच्या घाटकोपर येथील निवासस्थानाहून पाच मोबाइल्स हस्तगत करण्यात आले होते. त्यापैकी एका मोबाइलमधील सिमकार्ड पवार याच्या नावावर नाही. ते सिमकार्ड सुधन्वा गोंधळेकरने वैभव राऊतला दिले. राऊतने ते पवारला दिले. पवारने सिमकार्ड वापरून पुन्हा राऊतला परत केले. यातून पवार आणि अन्य आरोपींमधील संपर्क, समन्वय स्पष्ट होतो, असा युक्तिवाद एटीएसतर्फे करण्यात आला.

हिंदूविरोधी व्यक्तींपैकी एकाची इत्थंभूत माहिती काढण्याची जबाबदारी पवार याच्यावर होती. त्यानुसार त्याने मुंबईबाहेर हालचाली केल्या. नालासोपारा येथून हस्तगत करण्यात आलेले गावठी बॉम्ब पवारनेच बनवले. त्याने जालना आणि बेळगाव येथे शस्त्र प्रशिक्षणही घेतले होते. या गटाने बॉम्बस्फोट घडवले, असे तपासात पुढे आले आहे.

कळसकरला सीबीआय कोठडी

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डॉ. वीरेंद्र तावडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी रचलेल्या कटात शरद कळसकर सामील होता.  विशेष न्यायाधीश एस. एम. ए. सय्यद यांनी कळसकरला १० सप्टेंबपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.