दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्या घरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
करोनाला सणवार-दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महासाथीला इतक्या महिन्यांनंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत, हे विसरू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
युरोपातील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. त्या ठिकाणी रुग्ण झपाटय़ाने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधनसामग्री, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडत आहेत.
दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल हे ध्यानी घ्या, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.
त्रिसूत्री पाळा!
आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू करायची आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मुखपट्टीचा वापर- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई-वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा. फटाके वाजविणे आणि भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंबासह हा सण साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 12:09 am