News Flash

८१४ मुंबईकरांवर खटले

मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दरवर्षी पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येते

 

|| प्रसाद रावकर

डासप्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ

मुंबई : हिवताप, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वारंवार सूचना करूनही डासप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुमारे ८१४ मुंबईकरांविरुद्ध पालिकेने खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर निष्काळजी नागरिकांकडून सुमारे पावणेसात लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दरवर्षी पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येते. वस्त्या, झोपडपट्ट्या, चाळी, उच्चभ्रू वस्त्या, सार्वजनिक ठिकाणे, बंद गिरण्या आदी ठिकाणी पाहणी करून डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट केली जातात. पाण्याच्या टाक्या, फ्लॉवर पॉट, झाडाच्या कुंड्यांखाली ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या, वातानुकूलित यंत्रणेचे डक, उघड्यावर ठेवलेले भंगार साहित्य आदींची या मोहिमेत तपासणी केली जाते. डासांची उत्पत्तिस्थाने सापडल्यानंतर ती नष्ट केली जातात. तसेच या ठिकाणी पुन्हा डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून संबंधितांना सूचना केल्या जातात. काही नागरिक या सूचनांचे तंतोतंत पालन करून काळजी घेतात. मात्र काही मुंबईकर या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अल्पावधीत डासांची नवी उत्पत्तिस्थाने निर्माण होतात आणि साथीच्या आजारांना आयते आमंत्रण          मिळते. गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईत करोना संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात के ली होती. त्यामुळे करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबंधित ठिकाण निर्जंतुक करण्याची जबाबदारी कीटक नियंत्रण विभागावर सोपविली होती. मात्र पावसाळा जवळ आल्यानंतर हे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सोपविण्यात आले आणि कीटक नियंत्रण विभागाने डास निर्मूलन मोहीम सुरू के ली. करोनाकाळातही या विभागातील अधिकारी, कर्मचारी डास नियंत्रणासाठी पाहणी करीत होते. त्यामुळे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली होती. कीटक नियंत्रण विभागाच्या सूचना धुडकावल्याने डासांचा प्रादुर्भाव झाल्याप्रकरणी संबंधितांवर नोटीस बजावण्यात येते. त्यानुसार या विभागाने २०२० मध्ये सुमारे १२ हजार ३०३ निष्काळजी नागरिकांवर नोटीस बजावली होती. त्यानंतर यापैकी काही जणांकडून सुमारे सहा लाख ७५ हजार ५०० रुपये दंडही वसूल केला. सूचना, नोटीस आणि दंडात्मक कारवाईनंतरही न जुमानणाऱ्या ८१४ मुंबईकरांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.

डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट

तीन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार आहे. तत्पूर्वी मुंबईतील उत्पत्तिस्थाने शोधून ती नष्ट करण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. करोना संसर्गाचा धोका टळलेला नाही. या पार्श्वभूमी वर नागरिकांनी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सहकार्य करावे. घरात अथवा आसपासच्या परिसरात डासांच्या अळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन कीटक नियंत्रण विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:33 am

Web Title: avoid mosquito repellent measures akp 94
Next Stories
1 विकासकांना घसघशीत सूट
2 महापौरांच्या अडचणीत वाढ
3 यशवंत नाट्य मंदिराला अग्नीसुरक्षेचे आव्हान
Just Now!
X