मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावं असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. यामध्ये कोणतंही राजकारण आणलं जाऊ नये असंही त्यांनी खडसावलं आहे. अनिल देशमुखांनी यावेळी राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला वेळापत्रक सुचवलं असल्याचंही सांगितलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली लोकल सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला तसंच काही ठराविक प्रवाशांसाठी सुरु आहे. दरम्यान राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तयारी दर्शवली असून यासंबंधी विनंती करणारं पत्र रेल्वेला पाठवलं आहे. राज्य सरकारने प्रवासासाठी वेळापत्रक तयार केलं असून तेदेखील पत्रासोबत जोडण्यात आलं आहे.

यानंतर रेल्वेकडून मुंबई लोकल सुरु करण्यामध्ये असमर्थता दर्शवण्यात आली असून अडचणींचा पाढा वाचण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला सहकार्य करावं अशी विनंती केली आहे. “जर रेल्वेने सहकार्य केलं तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यामुळेच कोणतंही राजकारण न करता रेल्वेने सहकार्य करावं,” असं ते म्हणाले आहेत.

कसं असेल वेळापत्रक
– सर्व प्रवाशांना पहाटे पहिली गाडी सुटल्यापासून ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत, त्यानंतर स. ११ वाजल्यापासून सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि रात्री ८ वाजल्यापासून शेवटची लोकल सुटेपर्यंत प्रवासाची मुभा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
– अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआरकोड आणि ओळखपत्राच्या आधारे सकाळी ८ वाजल्यापासून १०.३० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.
– महिलांसाठी प्रत्येक तासाला स्वतंत्र गाडी सोडण्याचीही रेल्वेची तयारी आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे.

रेल्वेची चालढकल, अडचणींचा पाढा
सर्वच प्रवाशांना उपनगरी रेल्वे प्रवासास राज्य सरकारने मुभा दिली असली तरी रेल्वेने अडचणींचा पाढा वाचत चालढकल केली आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास अंतर नियम कसे पाळायचे, गर्दीवर नियंत्रण कसे ठेवायचे, असे प्रश्न रेल्वेने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार प्रवासाच्या प्रतीक्षेतच आहेत.
रेल्वेच्या सूचना काय?
* स्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला राज्याच्या पोलीस यंत्रणेचे सहकार्य आवश्यक.
* तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी पुन्हा यूटीएस मोबाइल तिकीट अ‍ॅप सुरू करणे.
* रेल्वे स्थानकातील प्रवेश नियंत्रणासाठी नवीन तंत्रज्ञान, प्रणालीचा वापर करणे.

रेल्वेचे संख्यागणित
– प्रवासी संख्या टाळेबंदीपूर्वीएवढी झाल्यास काय करायचे, असा रेल्वेचा मुख्य प्रश्न आहे.
– टाळेबंदीपूर्वी पश्चिम रेल्वेवर दररोज ३५ लाख आणि मध्य रेल्वेवर ४५ लाख असे ८० लाख प्रवासी प्रवास करत होते.
– सध्या एका उपनगरी रेल्वे फे रीत ७०० प्रवासी असा नियम आहे.
– पश्चिम रेल्वेने पूर्वीप्रमाणे १,३६७ रेल्वे फे ऱ्या चालवल्यास ७०० प्रवासी याप्रमाणे साधारण ९ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करतील.
– आता ७०४ लोकल फेऱ्यांमधून अत्यावश्यक सेवा कर्मचारी, महिला असे ३ लाख ९५ हजार प्रवासीच प्रवास करतात.
– मध्य रेल्वेवरही पूर्ववत १,७७४ फे ऱ्या चालवल्यास १२ लाख ४० हजारांपर्यंत प्रवासी प्रवास करू शकतील. सध्या ७०६ फेऱ्यांमधून ४ लाख ५७ हजार प्रवासी प्रवास करत आहेत.
– महिला विशेष वाढवण्यात अडचणी : महिला प्रवाशांसाठी दर तासाला विशेष फे री चालवण्याची सरकारची सूचना आहे. परंतु पश्चिम रेल्वेवर सध्या सहा तर मध्य रेल्वेवर दोन महिला विशेष फे ऱ्या धावत आहेत. याशिवाय प्रत्येक रेल्वेमध्ये महिलांसाठी २३ टक्के आसने राखीव आहेत. प्रत्येक तासाला महिला विशेष रेल्वे चालवल्यास अन्य प्रवाशांची गैरसोय होईल. सर्वसाधारण फेऱ्या कमी होऊन पुरुष प्रवाशांची गर्दी वाढेल, याकडे रेल्वेने लक्ष वेधले आहे.