प्रसाद रावकर

मुंबईमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. एका इमारतीमधील दहापेक्षा अधिक रहिवाशी करोनाबाधित झाल्यास किंवा दोन अथवा त्यापेक्षा अधिक मजल्यांवर बाधित रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत टाळेबंद करण्याचे नवे आदेश मुंबई महापालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जारी केले.

सुरुवातीला करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबंधित इमारत टाळेबद करण्यात येत होती. त्या इमारतींमधील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मात्र मनुष्यबळाचा अभाव लक्षात घेत या नियमात सुधारणा करण्यात आली आणि टाळेबंद इमारतीमधील बाधित रुग्णांचे नातेवाईक, संशयित रुग्णांचे नातेवाईक आणि अन्य रहिवाशांना जीवनावश्यक  वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. तसेच पालिकेच्या नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती. त्याचबरोबर संपूर्ण इमारत टाळेबंद करण्याऐवजी बाधित रुग्णाचे वास्तव्य असलेला मजला वा सदनिका प्रतिबंधित करण्याचे आदेशही मधल्या काळात देण्यात आले होते. आता  टाळेबंद इमारतींबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

आता इमारतीमधील एकाच घरात करोनाबाधित रुग्ण आढळल्यास ती अंशत: टाळेबंद करण्याचाही निर्णय नव्या आदेशात घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित इमारतीतील परिस्थिती लक्षात घेऊन विंग अथवा मजला टाळेबंद करण्यात येणार आहे. संपूर्ण इमारत वा तिचा काही भाग टाळेबंद करण्याबाबतचे अधिकार पालिकेच्या विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्त अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर..

संपूर्ण इमारत वा तिचा काही भाग टाळेबंद केल्यानंतर तेथील व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. सोसायटीची व्यवस्थापकीय समिती आणि सदस्यांना नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. टाळेबंद इमारत वा भागात वावर होऊ नये यासाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करावा, टाळेबंद कालावधीत घरकाम करणारे कर्मचारी, भाजी-फळ विक्रेते, धोबी आणि सेवा-सुविधा उपलब्ध करणाऱ्यांना संबंधित इमारतीत प्रवेश देता येणार नाही. करोनाची लक्षणे असणाऱ्या बाधितांना पालिकेच्या करोना रुग्णालयांमध्ये दाखल होणे बंधनकारक करण्यात आले आहे.