शीव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्रुटी व नियमबाह्य़ता स्पष्ट झाल्यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता काढण्याचा निर्णय घेतला तसेच तंत्रशिक्षण संचालनालयानेही महाविद्यालयाची मान्यता रद्द करून तेथील विद्यार्थ्यांना अन्यत्र हलविण्याची शिफारस केली असली तरी प्रत्यक्षात या महाविद्यालयावर मुंबई विद्यापीठासह तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप ‘सिटिझन फोरम फ ॉर सँक्टिटी एन एज्युकेशन सिस्टिम’ या संघटनेने केला आहे.
सिटिझन फोरमचे प्रमुख माजी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक वैभव नरवडे, प्राध्यापक समीर नानिवडेकर, प्राध्यापक शेलगावकर आदींनी बुधवारी तंत्रशिक्षण संचालनालयात संचालक सु. का. महाजन यांची भेट घेऊन वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयावर कधी कारवाई करणार याची विचारणा केली. त्यावेळी येत्या आठ दिवसांत या संस्थेसंदर्भातील अहवालाचा अभ्यास करून अंतिम कारवाई करण्याबाबत शासनाला शिफारस करू असे आश्वासन महाजन यांनी दिल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.
या महाविद्यालयात नियमबाह्य़ बांधकाम झाल्याबद्दल पालिकेने यापूर्वी कारवाई केली आहे. एआयसीटीईने मान्यता रद्द करूनही मुंबई विद्यापीठाकडून संलग्नता रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही की तंत्रशिक्षण संचालनालयाकडून कारवाई होत आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एआयसीटीईचे पात्रता निकष असलेच पाहिजेत तसेच निकषांची पूर्तता योग्य प्रकारे झाली आहे अथवा नाही हे पाहणे ही राज्याच्या तंत्रशिक्षण संचालकांची जबाबदारी असल्याचे सिटिझन फोरमचे म्हणणे आहे. विद्यमान संचालक सु. का. महाजन हे पात्रता निकषांची पूर्तता न केलेल्या अथवा त्रुटी असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करून महाजन यांच्याच चौकशीची मागणी आता आम्ही करणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.
वसंतदादा पाटील महाविद्यालयाबबत महाजन यांना विचारले असता, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. मुंबई विद्यापीठानेही या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्याऐवजी अशंत: सलग्नता काढण्याचा निर्णय घेतला असून कुलगुरु राजन वेळूकर हे नेमके कोणाचे हित जपतात, असा सवालही विद्यापीठातील अध्यापकांकडून करण्यात येत आहे. विद्यापीठातील एका वजनदार व्यक्तीचा मुलगा सदर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असल्यामुळेच वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयावर कारवाई होत नसल्याचा आरोप सिटिझन फोरमने केला आहे. एकूणच अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील घोटाळे, एआयसीटीई, अभियांत्रिकी संचालनालय व मुंबई विद्यापीठीची जबाबदारी टाळणाऱ्यांविरोधात आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.