आठवडय़ाची मुलाखत : सुमैरा अब्दुलाली

संचालक, आवाज फाऊंडेशन

मानवी आरोग्याला सुसह्य़ आवाजाची पातळी ही फार तर ८५ डेसिबलपर्यंत असू शकते. मात्र मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांमध्ये ही पातळी सर्रास ओलांडली गेल्याचे निदर्शनास येते. साधा लोकल प्रवासही याला अपवाद नाही. लोकल प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी आवाजाची पातळी शंभरी ओलांडते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो आहे. हा प्रश्न जाणून घेण्यासाठी मुंबईतील ‘आवाज फाऊंडेशन’ने रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या आवाजाच्या पातळीची मोजणी केली. त्यात ती धोकादायक अवस्थेपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. या पाश्र्वभूमीवर ‘आवाज फाऊंडेशन’च्या सुमैरा अब्दुलाली यांच्याशी साधलेला संवाद.

* रेल्वे प्रवासात आवाजाची पातळी मोजावी असे तुम्हाला का वाटले?

रेल्वेमध्ये वाढलेल्या आवाजाबद्दल मला सुरुवातीला ट्विटरवर अनेक तक्रारी आल्या. नंतर या तक्रारीत वाढ झाली आणि अनेकांनी फोन व मोबाइलवर संदेश पाठवूनदेखील कळवले. यात रेल्वे प्रवासी आणि रेल्वे स्थानकांच्या शेजारी निवासस्थाने असलेल्यांचा समावेश होता. त्यानंतर आम्ही हार्बर मार्गावर आवाजाची पातळी मोजण्यासाठीचे सर्वेक्षण केले. गेल्या वर्षी आम्ही पश्चिम रेल्वे मार्गावर अशाच प्रकारचे सर्वेक्षण केले. तेव्हाच्या सर्वेक्षणात आलेले निष्कर्ष आणि आत्ताच्या सर्वेक्षणात आलेले आवाजाच्या पातळीचे निष्कर्ष हे बहुतेक समानच आहेत. माहीम स्थानकाजवळ भजनी मंडळाने जेव्हा गाडीत प्रवेश केला तेव्हा त्यांच्या तबला वादनाने आवाज एकदम वाढल्याचे दिसले. आवाजाची पातळी पुढील प्रवासातही भजन सुरू असेपर्यंत तशीच होती. तसेच लोकल गाडय़ांचे ब्रेक दाबल्यावर देखील आवाजात भर पडली. हा ब्रेकचा आवाज जवळपास १०० डेसिबलच्या वर होता. रेल्वेने नियमित ब्रेक्सची दुरुस्ती व देखभाल केली तर हा आवाज टाळता येणे शक्य आहे.

* याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो?

मानवाला ऐकण्यायोग्य आवाज हा ५५ डेसिबलपर्यंत असतो. पण हल्ली हे शक्य नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार ८५ डेसिबलपर्यंतचा आवाज सुसह्य़ होऊ शकतो. मात्र त्याच्या वर आवाज गेल्यास त्याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर होऊ शकतात. आमच्या सर्वेक्षणानुसार, लोकल गाडय़ांमध्ये बहुतेक ठिकाणी आवाज हा ७० ते १०० डेसिबलच्या दरम्यान होता. आवाजाची ही पातळी मानवी आरोग्याला हानिकारक आहे. रेल्वे स्थानके व रेल्वेतील ध्वनिक्षेपकांच्या उद्घोषणा आणि लोकल गाडय़ांच्या ब्रेक्सचे आवाज आणि भजनी मंडळांचे कार्यक्रम यांमुळे हे ध्वनिप्रदूषण होत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आपल्या इथल्या प्रथितयश डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, वाढलेल्या आवाजाचा मेंदू व मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. इतरही अवयवांवर या आवाजाचा परिणाम होत असतो. रेल्वेत किंचितसा धक्का एका प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशाला लागला तरी त्यांच्यात मोठी भांडणे होतात आणि त्याचे तात्कालिक कारण हे ध्वनिप्रदूषणच आहे. तसेच हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि मनोविकार असलेल्या व्यक्तींची प्रकृती रेल्वे प्रवासात चिंताजनक झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो.

* रेल्वेला तुम्ही याबाबत नेमके काय उपाय सुचवलेत?

आम्ही प्रथम ट्विटरवर रेल्वेला याबाबत कळवले. त्यावर त्यांचा प्रतिसाद आल्यानंतर आम्ही आमचा अहवाल सविस्तरपणे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना कळवला. रेल्वेने या प्रश्नाचे नियोजन करण्यासाठी कार्यवाहीचा आराखडा तयार करणार असल्याचे कळवले. रेल्वेने प्रथम या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. ब्रेक्सची दुरुस्ती प्रथम त्यांनी केली तर हा आवाज कमी होण्यास मदत होईल. ज्या उद्घोषणा मोठय़ा आवाजात होतात त्या थोडय़ा कमी आवाजात करण्यात याव्यात. तसेच रात्रीच्या वेळेत मोठय़ा आवाजातील उद्घोषणा थोडय़ा कमी केल्या तरी चालतील. भजन मंडळांना आवरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

* उत्सव व भजनी मंडळांमुळे नेमके काय परिणाम होत आहेत?

भारतात सण, उत्सव आणि गोंगाट यांचे जवळचे नाते आहे. ते आता इथल्या नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे उत्सव असेल तर आवाज असलाच पाहिजे, ही आपली सांस्कृतिक गरज बनली आहे. गणेशोत्सव असो की रेल्वे गाडय़ांमधील भजनी मंडळे, त्यांच्याकडून वाढत असलेल्या आवाजाच्या पातळीची दखल घ्यावी असे कोणाला वाटत नाही. आपल्यामुळे ध्वनिप्रदूषण होत आहे याची जाणीव त्यांना होणे आवश्यक आहे. भजनाबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही. मात्र ती योग्य जागी ठिकाणी व्हावी. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधील डब्यातील एका कोपऱ्यात भजन म्हणणे सगळ्याच प्रवाशांना रुचेलच असे नाही. अनेक जण फोनवर बोलत असतात, लॅपटॉपवर काम करत असतात, कोणाचे डोके दुखत असेल, कोण आजारी पडले असेल. पण त्यांना अशा वेळी गृहीत न धरता हे भजनाचे कार्यक्रम सुरू असतात.

* रेल्वेने यावर कार्यवाही नाही केली तर पुढे काय करणार?

रेल्वेने आम्हाला कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही आम्ही आमच्या पातळीवर नियमित तपासणी करण्याचे ठरवले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आम्ही अशा प्रवाशांनाही विचारणार आहोत की रेल्वेने प्रवासादरम्यान होणाऱ्या आवाजावर मात करण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना केली आहे. ध्वनिप्रदूषणावर तोडगा काढण्यात रेल्वे यशस्वी झाली आहे का याची आम्ही पाहणी करत राहणार आहोत. रेल्वे यात काही करत नसेल तर आम्ही त्यांना वारंवार याबद्दल कळवत राहू. सध्या आम्ही त्यांना वेळ देत आहोत. त्यांनी आपल्या पद्धतीने या प्रश्नावर तोडगा काढावा. आम्ही त्यांना सहकार्यही करू. मात्र कालांतराने त्यांच्याकडून हा प्रश्न सुटू शकला नाही, तर न्यायालयात जाण्याचा पर्याय आमच्याकडे कायम खुला आहे. याचा त्रास रेल्वे प्रवाशांसह रेल्वेचे आणि रेल्वे पोलिसांवरही तितकाच होत आहे हेदेखील रेल्वेने ध्यानात घ्यायला हवे.