शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि शाहीर परिवाराच्या अट्टहासाने स्मारक धुळखात

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवामुक्ती आंदोलनात मोठे योगदान देणारे लोकशाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २०१६ मध्ये सातरस्ता येथील शाहीर अमर शेख मार्गावर आमदार निधीतून एक छोटेखानी स्मारक उभारण्यात आले. मात्र शिवसेनेतील अंतर्गत लाथाळ्यांमुळे २०२० साल उजाडले तरी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला मुहूर्त काढता आलेला नाही. त्यातच मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच स्मारकाचे लोकार्पण करण्याचा शाहीर परिवराचा अट्टाहासही लोकार्पण सोहळ्याच्या लांबणीला कारणीभूत ठरले आहे. परिणामी, गेली तीन-चार वर्षांपासून हे स्मारक धुळ खात पडले आहे.

बार्शी येथील एका गरीब कुटुंबात २० ऑक्टोबर १९१६ रोजी मेहबूब हुसेन पटेल यांचा जन्म झाला. त्यांची आई मुनेरबी यांच्याकडून त्यांना शाहिरीचे बाळगडू मिळाले. घरच्या गरीबीमुळे त्यांनी बसचालकासोबत क्लिनर म्हणून, त्यानंतर कापड गिरणीत कामगार म्हणून काम केले. गिरण्यांच्या संप काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा  लागला. तेथे कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या ते संपर्कात आले आणि त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. मास्टर विनायक यांच्या स्टुडिओत काम करताना त्यांना ‘अमर शेख’ हे नाव मिळाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ामध्ये अमर शेख यांनी आपल्या पोवाडय़ांनी जनजागृतीची मशाल पेटविली. त्यांच्या पोवाडय़ांनी चळवळीचा आवाज बुलंद झाला. त्याचबरोबर त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनातही हिरीरीने भाग घेतला होता.

सामाजिक चळवळींमधील त्यांचे योगदान लक्षात घेत पालिकेने सातरस्ता येथील त्यांच्या निवासस्थानाजवळील रस्त्याचे अमर शेख मार्ग असे नामकरण केले. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांनी अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे निमित्त साधून २०१६ मध्ये अमर शेख मार्गावर त्यांचे एक छोटेखानी स्मारक उभारण्यात आले. मात्र आजतागायत या स्मारकाचे लोकार्पण होऊ शकले नाही.

या स्मारकासाठी पुढाकार घेणाऱ्यांपैकी एका शिवसैनिकाचा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाद निर्माण झाला. या परिसरातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या त्यावेळच्या नगरसेविका आणि संबंधित शिवसैनिकामधील वाद विकोपाला गेला आणि या वादानंतर अमर शेख यांच्या स्मारकाकडे पूर्णच दुर्लक्ष झाले. अखेर भगव्या कापडाने हे स्मारक झाकून ठेवण्यात आले. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडली. मात्र स्मारकाच्या लोकार्पणाला आजतागायत मुहूर्त मिळालेला नाही.

दरम्यानच्या काळात शाहीर परिवारातील काही मंडळींनी या स्मारकाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा आग्रह धरला. तसेच या सोहळ्यातच महाराष्ट्रातील शाहिरांचा गौरव करण्याचीही मागणी केली. परिणामी, कार्यक्रमाचा खर्च वाढण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर संबंधित मंडळींनी त्याकडे कानाडोळा केला. एकूणच या गोंधळात गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ स्मारक झाकून ठेवण्यात आले आहे. कापडावरील धुळ झटकून स्मारकाचे लोकार्पण कधी करणार अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून होऊ लागली आहे.

शाहीर अमर शेखांच्या स्मृती पुढच्या पिढीच्या मनात कायम राहावी यासाठी सातरस्ता येथे त्यांचे स्मारक उभारले. दरम्यानच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली. त्यामुळो स्मारकाचा लोकार्पण सोहळा राहून गेला. मात्र लवकरच या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल.

– सुनील शिंदे, माजी आमदार